जयेश निरपळ
शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ जुलै अखेरपर्यंत पीक विम्याचे केवळ ८० हजार शेतकऱ्यांचे १ लाख ८० हजार अर्ज आल्याने संबंधित विमा कंपनी व कृषी विभाग धास्तावला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडून ग्रामीण भागात पीक विम्याबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने यावर्षी पीक विम्याच्या धोरणात बदल केला आहे. यात शासनाने अनेक अटी लादल्या आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा विविध पिकांचा विमा भरण्यासाठी शासनाने फार्मर आयडी बंधनकारक केला असून एक वर्षात शेतीची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अद्याप निघालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पिकांचा विमा भरण्यास अडचण येत आहे.
दुसरीकडे यंदा शेतकऱ्यांना तिमा हप्ता भरावा लागत आहे. पूर्वी पीक कर्जातून पीक विम्याची रक्कम कपात करण्यात येत होती. १ रुपयात विमा झाल्यानंतर मात्र पीक विम्यातून पैसे कमी करण्यात येत नव्हते.
यावर्षी सुद्धा पीककर्जाच्या रकमेतून विमा काढण्यात येणार नसून, शेतकऱ्यांसाठी ही बाब ऐच्छिक करण्यात आली आहे. तसेच १ रुपयांमध्ये पीक विमा योजना बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेले अर्ज
तालुका | शेतकरी | अर्ज | संरक्षित क्षेत्र (हे.) |
छत्रपती संभाजीनगर | ३३३८ | ७६८१ | ३४८२ |
गंगापूर | १२८५६ | २६३२३ | १५४२२ |
कन्नड | १५०८ | ३२२७६ | १५३९२ |
खुलताबाद | ३९२३ | ११३०१ | ४२९८ |
पैठण | ६३२९ | १४१५० | ७३५१ |
फुलंब्री | ४७७६ | ११७८९ | ५०५० |
सिल्लोड | १३३०१ | ३२६९१ | १४७८२ |
सोयगाव | ७४१५ | १२५८० | ९६२९ |
वैजापुर | १३२७४ | ३४१५७ | १५८०२ |
एकूण | ८०२९५ | १८२९४८ | ९११६० |
गतवर्षी साडेचार लाख शेतकऱ्यांनी काढला होता विमा
गतवर्षी जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ८२२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यंदा १८ जुलै अखेर जिल्ह्यात केवळ ८० हजार २९५ शेतकऱ्यांनी २१ हजार १६० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे.
गावोगावी पोहोचू लागले अधिकारी अन् विमा प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी आपल्या खरिपाच्या पिकाचा विमा काढून घ्यावा, याकरिता भारतीय कृषी विमा कंपनी व कृषी विभागाकडून गावोगावी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन तसेच समाज माध्यमांवर जनजागृती केली जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढून आपल्या पिकांना विमा कवच द्यावे, असे आवाहन गंगापूर तालुका कृषी अधिकारी बी.जे. जायभये यांच्यासह विमा प्रतिनिधी प्रवीण जगताप यांनी केले आहे.
त्रुटीत अडकले फार्मर आयडीचे अर्ज
• शासनाने फार्मर आयडी काढणे बंधनकारक केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह फार्मर आयडी काढण्यास अर्ज केले आहेत; मात्र, बहुतांश शेतकऱ्यांचे फार्मर आयडीचे अर्ज त्रुटीत अडकले आहेत.
• त्रुटीची पूर्तता करूनही अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळाला नाही. याचा फटका पीक विमा भरताना बसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे अधार कार्ड, बैंक पासबुक व सातबाऱ्यावरील नाव जुळत नाही. यामुळेही फार्मर आयडीसाठी दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावात त्रुटी येत आहेत.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी