किशोर वंजारी
नेर : तालुक्यातील पाथ्रड (गोळे) येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या आयुर्वेदिक दवाखाना परिसरात आयुर्वेदिक आरोग्य बाग फुलविण्यात आली आहे. ही बाग पाथ्रडवासीयाकरिता पक्षांच्या मंजूळ आवाजासह आरोग्य संजीवनी (Arogya Sanjeevani ) देत असल्याने जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली आहे.
'वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे' या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांतून वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे. नेमकी हीच बाब हेरून परिचर अतुल उडाखे यांनी मोठ्या कष्टातून दवाखान्याच्या एक एकर परिसरात औषधी उपयोगी आयुर्वेदिक झाडांची लागवड केली. एवढ्यावरच न थांबता बागेतील झाडांना बारमाही पाणी मिळेल, अशी व्यवस्था त्यांनी केली.
सेंद्रीय खताकरिता बागेतच गांडूळ खतनिर्मिती सुरु केली. शेण खताची योग्य मात्रा, दोन झाडातील विशिष्ट अंतर, योग्य नियोजन त्यामुळे ही बाग आज जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे.
बागेतील झाडे आता बरीचशी मोठी झालीत. प्रत्येक झाडाजवळ संबंधित वृक्षाचे नाव, त्याचा औषधी उपयोग दर्शविणारा फलक ठळक अक्षरात लावण्यात आला आहे. त्यामुळे बागेत फिरणाऱ्याला झाडांचे महत्त्व आणि त्याचा उपयोग याची माहिती मिळते.
येथील परिचर अतुल उडाखे यांनी शासकीय निधी सोबतच गावातील लोकांकडून लोकसहभाग घेऊन या बागेची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला. बागेत पक्षांच्या निवाऱ्याकरिता कृत्रिम घरटी झाडाला अडकविण्यात आले आहेत. यात पक्षांनी आपले घर केले आहे. त्यातून आता मंजूळ आवाजाची साद ऐकू येते, खारुताईसह अनेक पाखरांचा येथे मुक्त वावर असतो, दवाखान्याच्या भिंतीवरील सुविचारही आपले लक्ष वेधून घेतात.
बागेमध्ये या आहेत वनस्पती
पाथ्रड (गोळे) येथील ही बाग आवळा, शतावरी, खंडूचक्का, विलायची, दालचीनी, बाभूळ, ज्येष्ठमध, हळद, तेजपान, गवतीचहा, गुडमार, वावडिंग, रक्तचंदन, स्वेत चंदन, येरण, कडुलिंब, नागवेली, काळा धोतरा, काटसावर, ओवा, घुईनीब, उंबर, नगपंचा, शेवगा, कोरफड, बिबा, चाफा, काशीद, अशोक, पिंपळी, अस्थिजोड, ब्राम्ही, दमवेल, अंगकरा आदी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. तसेच गुलाब, मोगरा, जाई, पांढरा कण्हेर, शेवंती, ग्लाड, तुळस आदी वृक्षांनी बहरली आहे.
दवाखान्यात पंचकर्म चिकित्साही उपलब्ध
या आयुर्वेदिक दवाखान्यात रुग्णावर आयुर्वेदिक औषधी, ॲलोपॅथिक औषधी देऊन उपचार करण्यात येतो. ग्रामस्थ घरगुती उपचाराकरिता बागेतील औषधी झाडांची पाने, फुले, डहाळी घरी नेऊन सुद्धा उपचार घेतात. तसेच या आयुर्वेदिक दवाखान्यात पंचकर्म चिकित्सा सुद्धा उपलब्ध आहे. उडाखे यांच्या या उपक्रमाचा प्रशासकीय कार्यालयामध्ये कौतुक होत आहे.
मंदार पत्की यांनी दिली बागेला भेट
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी या बागेला भेट दिली. आयुर्वेदिक दवाखाना येथे पत्की यांचे स्वागत सरपंच नीलिमा चोपडे, उपसरपंच रजनी खडसे, पोलिस पाटील प्रफुल नेरकर, उमेश गोळे यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जया चव्हाण, ग्रा. पं. सदस्य नितीन चहांदे, आकाश तोंडरे, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, आशिष राऊत, आशिष गावंडे, आरोग्य सेवक आर. वानखडे उपस्थित होते.
कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी देण्याची गरज
गेल्या अनेक महिन्यांपासून येथे आरोग्य अधिकारी यांचे पद रिक्त आहे. दवाखान्याचा संपूर्ण भार अतुल उडाखे या परिचरवर आहे. आरोग्य अधिकारी यांचे पद रिक्त आहे. हे पद तातडीने भरण्याची गरज व्यक्त होत असून, कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी दिल्यास या उपक्रमाला आणखी बळ मिळेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.