Pune : महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सांख्यिकी माहितीतील सुधारणेसाठी Technical Committee of Direction (TCD) ही केंद्र शासनाची सर्वोच्च समिती आहे. या समितीची बैठक काल व आज म्हणजेच २९ व ३० जानेवारी रोजी पुण्यातील चिंचवड येथील रिजेंडा ग्रँड हॉटेल येथे पार पडली. भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्र शासनाचे अधिकारी आणि राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, Technical Committee of Direction (TCD) ही पशुधनाच्या संबंधित सर्वेक्षण आणि उपक्रमांच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन आणि देखरेख करणारी समिती आहे. पशुसंवर्धन विभागाचे धोरणे, तांत्रिक समस्या सोडवणे आणि कामाची दिशा ठरवण्याचे काम या समितीकडून केले जाते.
बैठकीच्या पहिल्या दिवशी देशातील आणि राज्यातील पशुधन उत्पादन आणि त्याच्या अंदाजावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यासोबतच पुढील वाटचालीवर अधिक भर देण्यात आला. प्रमुख उपक्रमांची अंमलबजावणी मजबूत करणे, पशुधन क्षेत्रात माहितीपूर्ण धोरण तयार करणे आणि शाश्वत विकास सुनिश्चित करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते. यावेळी या समितीने अनेक निर्णय घेतले आहेत.
दुसऱ्या दिवशी म्हणजे आज, राज्यातील सध्या सुरू असलेल्या पशुगणनेचा आढावा या समितीकडून घेण्यात आला असून यामध्ये काय अडचणी आहेत आणि त्यावर मात कशी करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यासोबतच तांत्रिक समस्येवर मात करून लवकरात लवकर पशुगणना पूर्ण करण्याच्या सूचनाही राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत.