कोल्हापूर : चंदगड, आजरा व कडगाव परिसराची रोजची सायंकाळ 'अण्णा', 'राजा', 'गणेश' या हत्तींनी आपल्या दहशतीखाली ठेवली आहे.
'बारक्या'चा सुसाट वेग मात्र शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. हे जरी असले तरी येथील गावकऱ्यांनीही त्यांच्यासोबतच राहण्याचा जणू निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळाले.
कर्नाटक, गोवामार्गेकोल्हापूर जिल्ह्यात हत्तींना येऊन २० वर्षे पूर्ण झाली आहेत. एका गॅस कंपनीने गोवा ते बंगळुरू गॅससाठी मोठे पाइप डोंगर फोडून याच भागातून घातले आणि गोवा-दोडामार्गातील हत्तींना जिल्ह्यात येण्यासाठी पाइप मार्गाचा हा रस्ता खुला झाला.
दोडामार्ग येथून कडा चढून वाघत्रे (ता. चंदगड) येथे हत्ती येऊ लागले. २००३-०४ मध्ये पहिल्यांदा १६ हत्तींचा कळप येथे आला. वर्ष २००५ मध्ये जेलुगडे येथे ५ हत्तींचा शॉक लागून मृत्यू झाला.
यानतंर हा कळप परतला. मात्र, काही हत्तींनी हा भ्रमणमार्ग कायम केला व ते आता स्थानिकच झाले आहेत. चंदगड, आजरा, कडगावमध्ये आता ८ हत्ती येतात.
त्यांच्या आकारमानानुसार त्यांच्या वर्तणुकीनुसार वनविभाग व स्थानिकांनी त्यांना 'अण्णा', 'राजा', 'गणेश', 'माई', 'बारक्या' ही नावे दिली आहेत.
'अण्णा' हा सर्वांत मोठा व धिप्पाड असा टस्कर असून, त्याच्या तोडीचा हत्ती नाही. 'राजा' व 'गणेश' हे 'अण्णा'पेक्षा थोडे लहान; पण पूर्ण तयार झालेले टस्कर आहेत. या हत्तींची शेतकऱ्यांत प्रचंड दहशत व उपद्रव्य गेली २० वर्षे सुरु आहे.
१६ हत्ती२००३-०४ मध्ये प्रथम १६ हत्तींचा कळप कोल्हापूर जिल्ह्यात आला होता. तेथून या हत्तींचा प्रवास कायम सुरु आहे.
पार्ले परिसरात 'बारक्या'ची हवा'बारक्या' हत्ती हा प्रचंड वेगवान असून, सात फूट उंचीचा आहे. त्याने पार्ले, गुळवडे व तिलारी परिसरात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. तो पिकांचे नुकसान करण्यात अग्रेसर आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची हा हत्ती एक डोकेदुखी बनला आहे.
'गणेश' स्वभावाने शांत तर 'माई' एकमेव हत्तीण● 'गणेश' हा लहानाचा मोठा याच परिसरात झाला असून, त्याने स्वतःची सत्ता ही आजरा तालुक्यात प्रस्थापित केली आहे. स्वभावाने थोडा शांत हत्ती असून, 'गणेश' फार उपद्रव करत नाही. मात्र, 'राजा' हा फार रागीट व उपद्रवी आहे.● या सर्व हत्तींमध्ये 'माई' ही एकमेव मादी हत्ती असून, तिच्यासोबत १ वर्षाचे व ३ वर्षांचे अशी दोन पिले आहेत. ही 'माई' या पिलांना घेऊन दोडामार्ग व सावंतवाडी परिसरात राहत आहे व ही पिले 'अण्णा'ची आहेत.● अजून एक ५ ते ६ वर्षांचे मादी पिलू 'अण्णा' स्वतः सोबत घेऊन फिरतो आहे. गेल्या काही वर्षापासून चंदगड, आजरा, कडगावमध्ये ८ हत्तींनी भ्रमणमार्ग कायम केला असून ते आता स्थानिकच झाले आहेत.
हे हत्ती २० वर्षांपासून येथेच राहिल्याने स्थानिकांनाही हे हत्ती आपलेसे वाटू लागले आहेत. हत्तींनी केलेल्या नुकसानीनंतर विरोध होतो; पण आम्ही तत्काळ नुकसानभरपाई देत आहे. - प्रशांत आवळे, चंदगड वनपरिक्षेत्र अधिकारी, कोल्हापूर