दत्ता पाटील
तासगाव : कृषी विभागात विभागीय स्तरावर काम करणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्याने नियम धाब्यावर बसवून शेतीशी संबंधित औषध कंपनी स्थापन केली.
स्वतःच्या पत्नीला संचालक करून त्या माध्यमातून ही कंपनी चालवली जात आहे. पदाचा गैरवापर करून कंपनीचे जाळे विस्तारले आहे.
मात्र, तरीदेखील कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची ना चौकशी करण्यात आली, ना कारवाई करण्यात आली. त्यामुळे कृषी विभागाच्या एकंदरीत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर शेतीच्याखते आणि औषधाच्या गुण नियंत्रणाची जबाबदारी निश्चित कली आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुण नियंत्रण अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्यानेच नियम पायदळी तुडवले आहेत. स्वतःच्या पत्नीच्या नावे कोल्हापूर जिल्ह्यात शेती औषधाशी संबंधित कंपनी स्थापन केली आहे.
तीन जिल्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून या कंपनीचे जाळे विस्तारले आहे.
वास्तविक कृषी विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करता येत नाही. यापूर्वीही काही अधिकाऱ्यांवर कृषी विभागाशी संबंधित संस्थेत पत्नी संचालक असल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.
मात्र, तरीदेखील एका बड्या अधिकाऱ्याकडून साडेचार वर्षांपासून पत्नीला संचालक करून कृषी कंपनी चालवली जात आहे. याबाबत 'लोकमत'च्या वृत्त मालिकेतून भांडाफोड करण्यात आला होता, तरीदेखील राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत डोळेझाक केली आहे.
नियमांचे उल्लंघन
१) कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी औषध कंपनी सुरू केल्यामुळे त्यांच्या अधिकारी पदाच्या कर्तव्यांशी विरोधाभास निर्माण होऊ शकतो.
२) कृषी अधिकाऱ्याने औषध कंपनी सुरू केल्यास खते, औषधे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नियंत्रण असते. त्यामुळे कंपनीच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर होऊ शकतो. ज्यामुळे पारदर्शकता आणि नैतिकतेबाबत प्रश्न उपस्थित होतो.
३) शासनाच्या सेवा नियमानुसार, सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यांच्या विरोधात कोणतीही व्यावसायिक किंवा व्यापारिक कार्ये करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले आहे.
४) वरिष्ठ कृषी औषध कंपनी सुरू केल्याने नियमांचे उल्लंघन होते, हे स्पष्ट आहे.
बोगसगिरी कारवाई बाबत प्रश्नचिन्ह
बड्या अधिकाऱ्यानेच स्वतःच नियमांचे उल्लंघन करून कृषी कंपनी स्थापन केली असेल, तर 'पीजीआर'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या आणि बोगस कंपन्या काढून शेतकऱ्यांची राजरोस फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कशी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
अधिक वाचा: भारतातील पहिला शेतकरी मालकीचा साखर कारखाना कुठे सुरु झाला? अन् कशी झाली साखर क्रांती? वाचा सविस्तर