जळगाव जिल्ह्याच्या पारोळा येथील कृषी केंद्रावरून पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरीचे वाण घेतले होते. वाण घेताना शेतकऱ्यांना प्रति बॅग २२ क्विंटल उत्पन्न येते, असे सांगण्यात आले. मात्र, हे वाण वापरल्यानंतर १ क्विंटलही उत्पन्न येणार नाही, अशी परिस्थिती आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे पंचायत समितीला निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पारोळा येथील एका कृषी केंद्रातून तुळशी-४०५ या वाणाची खरेदी करण्यात आली.
मात्र, या बाजरीच्या कणसांना दाणे आलेच नाही. काही ठिकाणीच दाणे आढळून येत आहेत. यासंदर्भात शेतकरी व कृषी केंद्रचालक बियाणे कंपनीशी संपर्क साधत आहेत. मात्र, कंपनीचे अधिकारीही टोलवाटोलवी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
'या' शेतकऱ्यांचे झाले नुकसान
बियाणे वापरणाऱ्या मोढाळे पिंपरीत राजेंद्र पाटील, सांगवीत अनिल पाटील, धर्मेंद्र पाटील, महेंद्र पाटील, सार्वेत इब्राहिम खाटीक, खेडीढोक-कल्याणसिंग पाटील, पारोळा-मोतीलाल भोई, अशोक महाजन, सांगवीत दत्तात्रय पाटील, शेवगेत गंजीधर पाटील, देवीदास पाटील, राजेंद्र पाटील, दळवेल येथील सुरेश पाटील यांना फटका बसला.