Join us

पीएम किसान बरोबरच आता कृषी योजनांच्या लाभासाठीही फार्मर आयडी अनिवार्य; निर्णय राज्यभर लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:26 IST

आता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी Farmer id ओळख क्रमांक मंगळवारपासून (दि. १५) बंधनकारक करण्यात आला आहे.

नितीन चौधरीपुणे : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्यात अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमांक पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी बंधनकारक असेल, असे सांगण्यात येत होते.

मात्र, आता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी हा ओळख क्रमांक मंगळवारपासून (दि. १५) बंधनकारक करण्यात आला आहे.

यातून शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार असून, बनावटगिरीला आळा बसणार आहे. परिणामी, सरकारचा निधीही वाचणार आहे.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भ (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत आहे.

महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभजलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे, हा त्यामागील उद्देश आहे.

कृषी योजनांच्या लाभासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने ठरविले होते.

सुरुवातीला केवळ पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना हा क्रमांक बंधनकारक असेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, आता सर्वच लाभाच्या योजनांसाठी हा क्रमांक बंधनकारक असेल, असे सूत्रांनी सांगितले.

९२ लाख शेतकऱ्यांना राज्यात १० एप्रिलपर्यंत ओळख क्रमांक देण्यात आले. त्यासाठी ग्राम कृषी विकास समिती, सामाईक सुविधा केंद्र, क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी, असेही निर्देश शासनाने दिले आहेत.

गैरव्यवहारामुळे फटका◼️ पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत गेल्या तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत. याचा फटका राज्य व केंद्र सरकारला बसत आहेत.◼️ तसेच पीएम किसान सन्मान योजनेतही बनावट अर्ज येत आहेत. यावर तोडगा म्हणून कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी हा ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.◼️ कृषी विभागामार्फत सर्व पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाइन प्रणालीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तांना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.◼️ तसेच जमाबंदी आयुक्तांना शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संबंधित माहिती म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या प्रणालीशी एपीआयद्वारे अॅग्रिस्टॅक आवश्यक कार्यवाही करावी.

अधिक वाचा: Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपेरणीराज्य सरकारकेंद्र सरकारकृषी योजनापीक विमाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाऑनलाइन