सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सातारा जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांची आणि फळबागांची मोठी हानी झाली. यामध्ये ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर ४ हजार २१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना ६ कोटी २९ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात १५ मे पासून पाऊस पडत सप्टेंबर हा होता. सप्टेबर महिना संपेपर्यंत हा पाऊस उत्तरार्धात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. सलग दोन-तीन दिवस धो-धो पाऊस पडत होता. यामुळे अनेक महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
कारण, शेती पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. कारण, ऐन पीक काढणीत पावसाने दणका दिला. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढत गेला. या पीक नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. तसेच नुकसानीची आकडेवारीही समोर आलेली आहे.
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा जिल्ह्यातील आठ तालुक्यांना फटका बसला आहे. यामध्ये ४ हजार २१९ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला, सोयाबीन, मका, उडीद, घेवडा, बाजरी, मूग, झेंडू, भुईमूग, आले, पावटा, कांदा, टोमॅटो आदी पिकांचा समावेश आहे. तसेच फळबागांचेही नुकसान झालेले आहे.
शासनाकडून अशी मिळणार मदत...
राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. यामध्ये माण तालुक्यातील शेतकऱ्यांना ४ कोटी ५२ लाख, खटावला १ कोटी ६५ लाख, कराड सुमारे दीड लाख, कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ७ लाख रुपयांहून अधिक रुपयांची मदत मिळणार आहे.
बागायत ३ हजार, जिरायत १,११८ हेक्टरचे नुकसान
• जिल्ह्यातील बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ३ हजार ५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला.
• तर जिरायत क्षेत्राचे १ हजार ११८ हेक्टर आणि फळबागांचे १९७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे.
माणमध्ये सर्वाधिक ६,७८४ शेतकरी बाधित...
• सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. माणला ६ हजार ७८४ शेतकऱ्यांना दणका बसला आहे. तालुक्यातील २ हजार ७९२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
• यानंतर खटाव तालुक्यात ४ हजार ८२ शेतकऱ्यांना फटका बसला. तर बाधित क्षेत्र १ हजार ३५३ हेक्टर आहे. कोरेगाव तालुक्यातील १२७ शेतकऱ्यांच्या ५२ हेक्टरचे नुकसान झालेले आहे.
• सातारा तालुक्यात ९ शेतकरी, कराडला ३६, पाटणला ३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. वाई तालुक्यातही १९ शेतकरी आणि महाबळेश्वरला ५३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे.
हेही वाचा : साताऱ्यात होणार २ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी; ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक