Join us

Agro Advisory : बदलत्या हवामानात असे करा पिकांचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:20 IST

Agro advisory : बदलत्या हवामानात पिकांची काळजी कशी घ्यावी याविषयीचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी दिला आहे. वाचा सविस्तर

Agro advisory : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्यात हवामानात(Weather) अनेक बदल(Change) होताना दिसत आहेत. कधी थंडी(Cold) तर कधी ढगाळ हवामान (Cloudy Weather) आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानात (Changing Weather) पिकांची काळजी कशी घ्यावी याविषयीचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी दिला आहे. वाचा सविस्तर

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात १२, १३ आणि १४ जानेवारी रोजी हवामान कोरडे राहण्याची तर उत्तर भागात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात येत्या ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर पुढील २ दिवसात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात १२, १३ आणि १४ जानेवारी रोजी हवामान कोरडे राहण्याची तर उत्तर भागात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात येत्या ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर पुढील २ दिवसात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १६ जानेवारीपर्यंत दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी आणि १७ ते २३ जानेवारीदरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान (पहिल्या आठवड्यापेक्षा) जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 पीक व्‍यवस्‍थापन

ऊस :  पूर्व हंगामी ऊसाची लागवड करून ६ ते ८ आठवडे झाले असल्यास २६० किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास यांच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० % ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

हळद : हळद पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस २५% २० मिली किंवा डायमिथोएट ३० % १५  मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामुळे विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे, उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात जमिनीतून क्लोरोपायरीफॉस ५०% ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

हळदीच्या पानावरील ठिपके / करपा रोग यांच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन १८.२% + डायफेनकोनॅझोल ११.४% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली + ५ मिली स्टीकरसह प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत.

हरभरा: हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी  ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५% इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

करडई  : करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% १३ मिली किंवा असिफेट ७५% १० ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी.

संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल १०% डब्ल्यूपी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांची सुदृढ वाढ होण्यासाठी तुतीची उत्तम प्रतीची पाने उत्पादन आवश्यक असते. तुती पानात 80 टक्के पाण्याचे प्रमाण असावे. त्यासाठी अळ्या अणायच्या अगोदर ४ दिवसांनी तुती बागेस पाणी देऊन घ्यावे. पानावर साठणाऱ्या धुळीमुळे दुधाळ रोग (ग्रासरी) होण्याचा धोका असतो, त्यामुळे रोडच्या लगत तुती बाग असेल तर नेहमी धुळ निघून जाण्यासाठी पाण्याचा फवारा करावा.

संगोपन गृहात तापमान २२ ते २८ सें.ग्रे. व ८० ते ८५ टक्के आर्द्रता मर्यादीत ठेवावी त्यासाठी छतावर छोटे स्प्रिंकलर बसवावेत व सिमेंटपत्रे असावेत. संगोपनगृहात आर्द्रता वाढवण्यासाठी ह्युमिडीटी फायर चा वापर करावा किंवा खिडक्यांना गोण पाटाचे पडदे लावून त्यावर ठिबक सिंचन संचाचे ड्रीपर लावावेत व १ एचपी मोटारच्या साहाय्याने आर्द्रता मर्यादित करावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत : शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी.

थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामुळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : livestock Vaccine : परराज्याच्या शेळ्या, मेंढ्या, उंटांना व्हॅक्सिन ? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमराठवाडापाऊसपीकपीक व्यवस्थापन