Pune : वन्य प्राण्यांमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास 10 हजार ते 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. राज्यातील विविध भागांमध्ये पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. पण या तुलनेमध्ये एकूण नुकसानीच्या केवळ 1 - 2% नुकसान भरपाई देण्यात येते असा अहवाल पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांनी प्रकाशित केला आहे.
दरम्यान, नैसर्गिक आपत्ती बरोबरच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शतकांची नुकसान होण्यामध्ये जंगली किंवा वन्य प्राण्यांचा मोठा वाटा आहे. गोखले इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, शेतकऱ्यांच्या मते वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे फक्त पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी 27 हजार रुपयांचे नुकसान होते. पण या वन्य प्राण्यांवर आळा घालण्यासाठी बुजगावणे, काटेरी तारांचे कुंपण, सामूहिक राखण किंवा सौर कुंपण याचाही खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो.
या अहवालानुसार, महाराष्ट्रात पीक नुकसानीची भरपाई हा शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क असला तरी वास्तवात मात्र एक ते दोन टक्केच नुकसान भरपाई मिळते. दरम्यान अनेक शेतकरी गुंतागुंतीची प्रक्रिया आणि अल्प मोबदला यामुळे व नुकसान भरपाईचे दावे करण्यास टाळतात. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडून दिल्याचे धक्कादायक वास्तव या अहवालातून समोर आले आहे.
वन्य प्राण्यांमुळे केवळ पिकांचे नुकसान होत नसून शेतकऱ्यांवर दूरगामी परिणाम होताना दिसून आले आहे. यामध्ये एखाद्या हंगामात कोणतीही पीक न घेणे, माकड किंवा रानडुकरांच्या त्रासामुळे परसबाग बंद करणे, शेतामध्ये पीक घेणे पूर्णपणे बंद करणे, शेतीचे क्षेत्र कमी करणे,
मराठवाडा आणि खानदेश यासारख्या भागात काही पिके पूर्णपणे सोडणे असा धक्कादायक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. यासोबतच शेतमजुरांची उत्पन्न कमी होणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे, अतिरिक्त मंजुरीचा खर्च वाढणे आणि शेती सोडून शहराकडे स्थलांतर वाढणे असे दीर्घकालीन परिणाम दिसून आले आहेत.
दरम्यान, संशोधनातून समोर आलेल्या धक्कादायक वास्तवानंतर या अहवालातून राज्य सरकारला काही शिफारशी करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये नुकसान भरपाई व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसान भरपाई सोबतच उत्पादन वाढीसाठी उत्तेजनही दिले जाण्याची गरज असल्याची आणि वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणाऱ्या नुकसानीवर दीर्घकालीन संशोधन करण्याची गरज असल्याची शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे.
Read More : Monsoon Update : खोळंबलेला मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरु, पुढील तीन-चार दिवस...