आयुब मुल्ला
रब्बी हंगामात हरभरा व मसूर पिकाच्या नवीन वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ८५० किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. १९ हजार ६०० क्विंटल बियाणे वितरित करून पीक कापणी प्रयोगाद्वारे त्याची उत्पादन क्षमता तपासली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात हरभरा, शाळू, गहू ही पिके रब्बी हंगामात जास्त घेतली जातात. हरभरा पिकाचा बेवड चांगला असल्याने शेतकरी हमखास पेरणी करतो. दर चांगला मिळत असल्याने विक्रमी उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. या पिकातून दुहेरी फायदा होतो. शाळूही घरी वापरण्यासह वाळलेल्या पिकाचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.
मसूर हे एवढ्या ताकदीने पुढे जाणारे नसल्याने व त्याला भौगोलिक वातावरण पूरक नसल्याने या पिकाचे क्षेत्र वाढताना दिसत नाही; परंतु हे वाण विकसित करणे हा हेतू असल्याने जास्त प्रमाणात बियाणे दिले जाणार आहे. संपूर्ण राज्यात कृषी विभागाने या दोन्ही पिकांच्या नवीन वाणांना विकसित करण्याची भूमिका स्वीकारली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्यअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर या वाणांचा प्रसार केला जाणार असून, त्यातून कडधान्य क्षेत्र विस्तारण्यास मदत होणार आहे. वैयक्तिक, प्रयोगशील, प्रगतशील शेतकऱ्यांना हे बियाणे दिले जाणार आहे. राष्ट्रीय बीज निगम संस्थेकडून या बियाणांचा पुरवठा केला जाणार आहे.
हरभरा बियाणाचे प्रतिकिट वजन १६ किलो असून त्याच्या ६०० किटचे, तर मसूर बियाणाचे वजन प्रतिकिट ८ किलो असून त्याच्या १ हजार २५० किटचे वाटप केले जाणार आहे.
अनुदानावर किट
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी ज्वारीचे बियाणे वितरित केले जाणार आहे. शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, करवीर, कागल, गडहिंग्लज तालुक्यांत ७४० हेक्टरवर पेरणी होईल एवढे बियाणे दिले जाणार आहे. सोबत पन्नास टक्के अनुदानावर निविष्ठाचे किट देण्यात येणार आहे.
दोन प्रकारचे वाण
हरभरा वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ११० ते ११५ दिवसांचे हे पीक असून हेक्टरी २२ ते २५ क्विंटल उत्पादन निघते. मसूरमध्ये दोन प्रकारचे वाण आहेत. त्यातील एल- ४७२७ वाणाचा कालावधी ९२ ते १२८ दिवस असून, ११ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टर उतारा आहे. एल- ४७२९ वाणाचा ९६ ते ११० दिवस कालावधी असून १७ ते १८ क्विंटल प्रतिहेक्टर उतारा आहे.
प्रत्येक तालुक्याला हे किट उपलब्ध केले जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी सहायक कृषी अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून हरभरा, मसूर बियाणे किट घ्यावीत. - जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
