Join us

शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग सरसावला; खरिपातील तक्रारींच्या निवारणासाठी विशेष कक्ष स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:28 IST

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव येथील तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चाहूल लागली असून, त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यात शेतातील जुनी पिके, तण आणि ढेकळं काढून टाकणे, नांगरणी करून जमिनीचा पोत सुधारणे, पावसाच्या आधी चर खोदणे आदी कामे सध्या करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडूनही तयारी करण्यात येत आहे.

त्यानुसार खरीप हंगाम २०२५ मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावीत आणि त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी तालुक्यातील कृषी निविष्ठा केंद्रांची नियमित तपासणी केली जात आहे. यासोबतच, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिली.

या तक्रार निवारण केंद्रात शेतकऱ्यांना खते, बियाणे आदींच्या अनुषंगाने तक्रार करता येणार आहे. तक्रारींसाठी शेतकऱ्यांनी लेखी अर्जासह खरेदी पावती, सात-बारा, होल्डिंग आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तक्रार अर्जावर शेतकऱ्यांनी पत्ता, गाव, तालुका आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कार्यालयात या तक्रारी नोंदवता येणार आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, पक्की पावती घ्यावी आणि त्यावर बियाणे उत्पादनाचा लॉट नंबर, उत्पादन दिनांक आदी माहिती तपासावी. नोंदणीकृत आणि लेबल क्लेम असलेल्या निविष्ठांचीच खरेदी करावी, असेही आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

खत, बियाणांची कृत्रिम टंचाई केली जाते निर्माण

खते, बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. खरीप हंगामात बी-बियाण्यांची तसेच खतांची कमतरता पडते. त्यामुळे पेरण्या तोंडावर असताना शेतकऱ्यांना भटकंती करावी लागते. काही ठिकाणी अधिक पैसे देऊन बी-बियाणे व खते खरेदी करावी लागतात. अशा वेळी संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीखरीपछत्रपती संभाजीनगरमराठवाडा