Pune : राज्यातील कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या ICARच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेश फेरीद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. सन २०२४-२५ हया शैक्षणिक वर्षातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १८सप्टेंबर २०२४ ते २५ ऑक्टोबर २०२४ ह्या कालावधीत कृषी परिषदेकडून राबविण्यात आली आणि कृषी परिषद स्तरावरील सर्व जागावंर प्रवेश प्रक्रिया संपन्न झाली. परंतु भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली (ICAR) यांना वर्ग जागांवरील त्यांच्याकडील प्रवेश प्रक्रिया ०८ नोव्हेंबर रोजी झालेली आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने २०२४-२५ ह्या शैक्षणिक वर्षातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा विद्यापीठ स्तरावर भरण्याकरीता सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे १० डिसेंबर रोजी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या मुख्यालयी 'जागेवरील प्रवेश फेरी' राबविण्यात येणार आहे. सदर प्रवेश फेरीद्वारे कृषी परिषदस्तरावर यापूर्वी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत रिक्त जागा तसेच भाकृअपच्या कोटयातील रिक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जागेवरील प्रवेश फेरीद्वारे भरावयाच्या जागांचा https://pg.agrimcaer.in हया संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासंदर्भात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सन २०२४-२५ वर्षाकरीता प्रवेशासाठी पात्र असलेल्या अंतिम गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांना कळविण्यात आले आहे.
दरम्यान, सन २०२४-२५ ह्या शैक्षणिक वर्षाच्या कृषी परीषदेच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले आणि चालू शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित नसलेले (not admitted) उमेदवार १० डिसेंबर रोजीच्या 'जागेवरील प्रवेशफेरी 'करिता पात्र असतील. तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत सध्या प्रवेशित उमेदवारास जागेवरील प्रवेश फेरीमध्ये प्रविष्ठ व्हावयाचे असल्यास अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा सध्याचा प्रवेश रद्द केल्यास त्यांना जागेवरील प्रवेश फेरीमध्ये प्रविष्ठ होता येईल. परंतु अशा पात्र उमेदवारांनी पुढील बाबी विचारात घ्याव्यात.
(१) रिक्त जागांचा तपशील विचारात घेऊन दि. १०/१२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे व शुल्कासह उमेदवारांनी संबंधित कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयी उपस्थित राहावे.
(२) जागेवरील प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शासननिर्णयानुसार कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती/शुल्काची प्रतिपूर्ती लागू होणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
(३) सविस्तर माहितीसाठी कृषी परीषदेच्या www.mcaer.org परीपत्रकाचे अवलोकन करावे. या संकेतस्थळावरील प्रवेशेच्छूक विद्यार्थ्यांनी संकेत स्थळावरील उपलब्ध रिक्त जागांची माहिती घेवून विद्यापीठ मुख्यालयी सर्व आवश्यक कागदपत्रांसह 'जागेवरील प्रवेशफेरी 'उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.