शेतकऱ्यांकरिता पंचायत समितीमार्फत विहिरींसाठी धडक सिंचन विहीर योजना राबविली जाते. मात्र या योजनेतून मंजूर झालेली विहीर चक्क चोरीला गेल्याची तक्रार गटविकास अधिकारी नेर यांच्याकडे प्राप्त झाल्याने या प्रकाराबाबत तालुक्यात खमंग चर्चा सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील शेंद्री (खुर्द) येथील भरत गुलाब राठोड या शेतकऱ्याच्या शेतात या योजनेतून विहीर मंजूर होती. मात्र वरील शेताचे सातबाराप्रमाणे शेतात आजघडीला विहीर नाही. त्यामुळेच सदर विहीर चोरीला गेली आहे. अशा आशयाचे पत्र गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले. या संदर्भीय पत्राची गंभीर दखल घेत.
शेतातील सिंचन विहिरीचा पंचनामा करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी पावले उचलली आहेत. गटविकास अधिकारी यांनी नेर तहसीलदार यांना विनंतीपत्र पाठविले आहे.
चोरीला गेलेल्या विहिरीचा पंचनामा करण्याकरिता तलाठी शेंद्री (खुर्द) यांना हजर राहण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे, अशा आशयाचे विनंती पत्र दिले आहे. आता चोरीला गेलेल्या या विहिरीचे पुढे काय होते? चौकशीतून काय खुलासे होतात याची प्रतीक्षा आहे.
नियमाला दिली जाते तिलांजली
योजनेतून धडक सिंचन विहीर मंजूर झाल्यावर सदर विहिरीचे खोदकाम ७० टक्के मजूर व ३० टक्के यंत्राच्या साहाय्याने करणे नियमात आहे. मात्र नियमाला तिलांजली दिली जाते. जॉबकार्डधारकाने काम करावे असा नियम असताना त्याकडेही दुर्लक्ष करून आपल्या जवळच्या आणि ओळखीच्या सदस्याच्या नावाने मजुरी काढली जात असल्याच्या या योजनेबाबत तक्रारी वाढत आहेत.
सदर विहीर चोरीची तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत तहसीलदारांना या विहिरीच्या चौकशीबाबत पत्र दिले आहे. विहिरीचा पंचनामा करून पुढील चौकशी प्रक्रिया करण्यात येईल. - आशिष राउत, सहायक गटविकास अधिकारी पं. स., नेर.
हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी