Join us

शाश्वत देशी गोपालन या विषयावर तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम होणार सुरू; 'येथे' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 17:28 IST

Desi Cow Sangopan : देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात शाश्वत देशी गोपालन या विषयावरील तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. 

पुणे : पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात शाश्वत देशी गोपालन या विषयावरील तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. 

राज्य शासनाने पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये सन् २०२० मध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे.

या केंद्रामध्ये देशांमध्ये दुधाकरिता प्रसिद्ध असणाऱ्या साहिवाल, गीर, थारपारकर, लाल सिंधी व राठी या देशी दुधाळ गोवंशांवर त्यांची दूध उत्पादन क्षमता, महाराष्ट्रातील वातावरणामध्ये समरस होण्याची क्षमता, कृत्रिम रेतन, लिंग निर्धारित वीर्य मात्रांचा वापर, भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान, दूध उत्पादन व दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती होते. 

तसेच त्यांचे पुढे विपणन - विक्री, गोमय व गोमूत्रावरील प्रक्रिया युक्त पदार्थांची निर्मिती व विपणन - विक्री, कृत्रिम बुद्धिमत्ता - इंटरनेट ऑफ थिंग्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुरांचे आरोग्य, गोठा व दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे अशा अनेकविध गोष्टींबद्दल संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

त्यासाठी या केंद्रावर साहिवाल, गीर, थारपारकर, लाल सिंधी व राठी या गायींच्या देशी दुधाळ जातींच्या कळपांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील खिलार, डांगी, कोकण कपिला, लाल कंधारी, देवणी व गवळाऊ या गाई तसेच भारतामध्ये छोट्या आकारासाठी प्रसिद्ध असणारी पुंगनूर गाय देखील जतन केली आहे.

सदर प्रशिक्षण वर्ग हा देशी गायींच्या व्यवस्थापनातील विविध विषयांवरती प्रात्यक्षिकांसह आहे. सदर प्रशिक्षण हे महाराष्ट्रातील इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रथम अर्ज करणाऱ्या १० प्रशिक्षणार्थींसाठी आहे.

शाश्वत देशी गोपालन या प्रशिक्षणामध्ये दैनंदिन जनावरे व्यवस्थापन, वर्षभर हिरवा चारा नियोजन, जनावरांसाठी समतोल आहार, जनावरांच्या आहारामध्ये औषधी वनस्पतींचा वापर, दूध व दूधगजन्य पदार्थ निर्मिती, शेण व गोमूत्र प्रक्रिया, गांडूळ खत निर्मिती, स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत निर्मिती, सेंद्रिय जैविक मिश्रण निर्मिती, गोपालन व दुग्ध व्यवसायात विविध मशिनरींचा वापर, क्षार खनिजांचे महत्त्व, डेअरीतील विविध मशिनरी, ॲप्स व माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मुरघास निर्मिती, इ. विविध बाबींचा समावेश असून प्रशिक्षणार्थींनी या सर्व विषयात संपूर्णतः प्रत्यक्षिकांसह प्रशिक्षण घेणे अपेक्षित आहे.

अशा प्रकारे शाश्वत देशी गोपालनाबद्दल प्रात्यक्षिकांसह तीन महिने कालावधीचे दीर्घ कालीन निवासी प्रशिक्षण गोपालन करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता उपलब्ध करून देण्याचा हा राज्यातीलच नव्हे तर देशातीलही पहिलाच प्रयत्न आहे. सदरचे प्रशिक्षण स्वतःचा देशी गोपालन आधारित दुग्ध व्यवसाय सुरू करण्यास इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.  प्रशिक्षणाची तपशीलवार माहिती www.icrtcmpkv.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना रु.२७००/- प्रति महिना विद्यावेतन देण्यात येईल. 

यासाठी इच्छुक उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण गुणपत्रक /प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो अश्या दस्ताऐवजांच्या मूळ व छायांकित प्रति घेऊन दि. २९ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत शासकीय सुट्ट्या सोडून देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. संपर्क ८३७८०५३२६४/ ९८९०५०५६४९.

हेही वाचा : Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगायदुग्धव्यवसायपुणेशेतकरीदूधव्यवसायशेती