बारामती : अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचालित कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी 'भीमथडी सिलेक्शन' हा सीताफळाचा नवीन वाण सिलेक्शन पद्धतीने विकसित केला आहे.
bhimthadi selection या वाणाला 'पिकवान संरक्षण, शेतकरी हक्क कायदा कलम २००१' नवी दिल्ली यांच्या अंतर्गत स्वामित्व हक्क (पेटंट) मिळाला आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र कृषी विज्ञान केंद्राला मिळाले आहे. सन- २०२३ मध्ये पेरूचा 'रत्नदीप' वाणास स्वामित्व व हक्क प्रमाणपत्र मिळाले होते.
आता सीताफळाच्या 'भीमथडी सिलेक्शन' वाणाससुद्धा स्वामित्व हक्क प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे.
फळ संशोधन केंद्र, संगारेड्डी, तेलंगणा येथील आणलेल्या सीताफळाचा 'बाळानगर' या वाणामधून निवड पद्धतीने 'भीमथडी सिलेक्शन' हा नवीन वाण विकसित करण्यात आला आहे.
अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातील उद्यान विद्याचे विषय विशेषज्ञ यशवंत जगदाळे यांनी दिली. ते म्हणाले की २०१३ पासून कृषी विज्ञान केंद्र मध्ये भीमथडी सिलेक्शन या वाणाचे संशोधन सुरू होते.
स्वामित्व हक्क प्रमाणपत्रामुळे नवीन वाणावर बारामती कृषी विज्ञान केंद्राचा अधिकार असणार आहे. या वाणाचे कलम तयार करणे आणि त्याची विक्री करणेचे सर्व अधिकार केंद्राकडे राहणार आहेत.
'भीमथडी सिलेक्शन' सीताफळ वाणाची वैशिष्ट्ये
◼️ फळे आकर्षक, आकाराने मोठी.
◼️ गरामधील पाकळ्यांची संख्या अधिक.
◼️ घट्ट आणि रसालदार गर, उत्तम स्वाद.
◼️ झाडावरील फळांची संख्या : ११० ते १५०.
◼️ वजन : ३२० ते ३६० ग्राम, बियांचे प्रमाण कमी.
◼️ फळामध्ये गराचे प्रमाण जास्त आल्यामुळे प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी.
वाणाची नोंदणी करण्यासाठी डेप्युटी रजिस्टार डॉ. शिवाजी गुरव, पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान बंगलोरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. टी. सक्तीवेल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त, विष्णुपंत हिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी या संशोधनाबद्दल यशवंत जगदाळे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा: आता जमीन मोजणीचे प्रकरणे ३० ते ४५ दिवसांत निकाली लागणार; महसूल विभागाने घेतला 'हा' निर्णय