अझहर शेख
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वनविभागाकडून गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन सर्रासपणे सरसकट पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत आहे. मात्र, पिंजऱ्यात अडकलेले बिबटे आता सोडायचे कोठे अन् कसे? हा यक्षप्रश्न वनविभागापुढे उभा राहिला आहे.
नाशिक वनवृत्तातील अहिल्यानगर, संगमनेर अन् जुन्नरच्या वनखात्यापुढे याबाबत पेच निर्माण झाला आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे ९१ बिबटे सध्या पिंजऱ्यात कैद आहेत.
नाशिक, अहिल्यानगर, पुणे या तीन जिल्ह्यांत मानव-बिबट्या संघर्ष मागील दोन महिन्यांत उफाळून आलेला राज्याने अनुभवला. नाशिकसह कोल्हापूर, नागपूर या शहरांमधील लोकवस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पंधरवड्यात वनविभागाने 'रेस्क्यू' केले आहे.
मनुष्यहानी रोखण्यासाठी वनखात्याकडून जागोजागी पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे बिबटे अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनविभागासमोर प्रश्नचिन्ह आहे.
पिंजऱ्यात कैद बिबटे असे...
नाशिक शहर टीटीसी - १५
संगमनेर उपविभाग - २५
माणिकडोह निवारा केंद्र - ४५
सिन्नर वनोद्यान - ६
नाशिक वनवृत्तांतर्गत नाशिकसह संगमनेर, अहिल्यानगर याठिकाणी संघर्ष अधिक असल्यामुळे लोकआग्रहास्तव पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात आली. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्वच रेस्क्यू सेंटर हाऊसफुल झाले आहेत. लवकरच याबाबत आवश्यक ते निर्णय घेतले जाईल. - जी. मल्लिकार्जुन, मुख्य वनसंरक्षक, नाशिक वनवृत्त.
सर्वच ठिकाणी क्षमता संपुष्टात...
• बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचे पुनर्वसन केले जाते. या पुनर्वसन केंद्राची क्षमता २५ इतकी आहे, तसेच जुन्नर वनपरिक्षेत्रातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रातसुद्धा क्षमतेपेक्षा जास्त बिबटे आहेत, तसेच नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव रेस्क्यू सेंटरचीही क्षमता संपुष्टात आली आहे.
• या केंद्राची बिबट्या ठेवण्याची क्षमता २० असून सध्या ३० बिबटे याठिकाणी आहेत. नाशिकला टीटीसी उभारण्यात आलेले आहे. यामध्ये दहा वन्यप्राणी ठेवण्याची क्षमता असून सध्या येथे तीन बछड्यांसह १५ बिबटे आहेत.
• यामुळे एखादा जखमी बिबट्या उपचारासाठी आल्यास त्यास जागाही उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती आहे. वाघांसाठी उभारलेल्या दोन्ही 'एन्क्लोझर'मध्येही बिबटे ठेवले आहेत.
हेही वाचा : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे आणि आरोग्यदायक परिणाम वाचून तुम्हीही होणार थक्क
