चालू गाळप हंगामात हिंगोली जिल्ह्याच्या वसमत विभागातील साखर कारखान्यांनी आपला वेग कायम राखला असून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन सहकारी आणि एका खासगी कारखान्याने मिळून एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे.
शेतात उभा असलेला ऊस वेगाने कारखान्यांकडे वळत असून फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्व उसाचे गाळप पूर्ण होईल, असा विश्वास कारखाना प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.विभागातील तिन्ही कारखान्यांनी आपापल्या क्षमतेनुसार गाळप प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे.
पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ८७ दिवसांत ३ लाख ४८ हजार, कोपेश्वर साखर कारखाना ८६ दिवसांत ३ लाख १३ हजार, टोकाई सहकारी साखर कारखान्याने ७५ दिवस १ लाख २३ हजार असा एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे आतापर्यंत गाळप केले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
यावर्षी गाळप प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू असल्याने फेब्रुवारीअखेरपर्यंत कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळपाला जाईल. यामुळे उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच ऊस तुटणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन चोख असल्यामुळे गाळपाचा वेग समाधानकारक आहे.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
