पुणे : "देशातील सर्वात मोठ्या विद्यापीठात कृषी महाविद्यालय, पुणे येथील मृद विज्ञान विभाग हा ब्रिटिश काळापासून सुरु आहे. मातीचे महत्त्व ब्रिटिशांनी ओळखले होते म्हणून जवळपास १२० वर्षापूर्वी सदर विभागाची निर्मिती ब्रिटीशांनी केली होती. या विभागाचे नुतनीकरण करून माती आणि पाणी परिक्षण प्रयोगशाळा अत्याधुनिक करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे. यंदा ६ हजार उस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १०० टन खोडवा उसाचे उत्पादन काढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने कृषी महाविद्यालय पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील मृद विज्ञान विभागाच्या वतीने जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात भुमाता पुजन व दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महात्मा फुले कृषि कृषी विद्यापीठाचे कुलगुरु कर्नल डॉ. पी. जी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्यातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून तंत्रज्ञान प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध सामंजस्य करार केले आहेत. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने फक्त मातीचे पुजन करून चालणार नाही तर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होण्याची कारणे शोधून जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी मृदा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे."
"त्यासाठी जागतिक अन्न व कृषि संघटनेच्या माध्यमातून या वर्षी मातीची तपासणी, निरीक्षण आणि व्यवस्थापन ही संकल्पना मांडली आहे. माती ही अनेक सुक्ष्म जीवाणूंची संजीवनी आहे म्हणून जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म चांगले असतील तरच तिचे आरोग्य चांगले राहते, म्हणून विशेषतः क्षारपड जमिनीची सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाचे संशोधन प्रभावी ठरले." असे कुलगुरूंनी नमूद केले.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोठे काम केले असून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरणपूरक एकरी १०० टन खोडवा ऊस व्यवस्थापन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि सातारा जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांच्या सहकार्याने ३०२२ शेतकऱ्यांच्या शेतावर राबविला आहे. या प्रकल्पामध्ये माती व पाणी परिक्षण आधारित एकरी १०० टन खोडवा ऊस उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. हा देशातील पथदर्शी आणि अत्यंत महत्त्वकांशी उपक्रम असून यावर्षी हा प्रकल्प ६००० शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येणार असल्याची ग्वाही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली.
"यापुढील काळात पिक उत्पादन वाढीसाठी मातीच्या आरोग्य संवर्धनासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. अशा बँकेच्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे देशातील सर्वोत्तम बँक म्हणून आमच्या बँकेचा नावलौकिक आहे. कृषि अधिकारी नेमूल उत्पादकता वाढविण्यासाठी बँकेचे प्रयत्न केले आहेत. क्षारपड जमिन सुधारणा कार्यक्रम बँकेच्या पुढाकाराने सुरु आहे. परंतु शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी मृदा आणि पाणी परिक्षण केले तरच सेंद्रिय कर्ब, सामू या बाबतीत योन्य ज्ञान प्राप्त होते. सदर मृदा दिनाच्या निमित्ताने कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांच्या शेतावर होत असलेला तंत्रज्ञानाचा प्रसार हीच खरी विद्यापीठाची प्रमुख ओळख आहे असे डॉ. राजेंद्र सरकाळे बोलताना म्हणाले.
या प्रसंगी मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाची माजी विभाग प्रमुख डॉ. जे. डी. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यापीठाचा कुलगुरु कसा असावा याचा आदर्श कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी घालून दिला असल्याचे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसाराचे प्रभावी कार्य करीत आहे. जागतिक तापमान वाढ, जमिनीचे खालावत असलेले आरोग्य आणि भू प्रदुषण या आवाहनाला प्रतिसाद देत असताना जमिन सुरक्षा संकल्पना लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. त्या दृष्टिने कृषि महाविद्यालय, पुणे येथील मृद विज्ञान विभागात सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्वार त्यांनी काढले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि महाविद्यालय, पुणे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांनी केले. तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा चे कार्यकारी संचालक श्री. जिवाजी मोहिते, रयत अथणी साखर कारखाना लिमिटेल कराडचे युनिट प्रमुख श्री. रविंद्र देशमुख, राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क, पुणे चे उपअधीक्षक श्री. उत्तमराव शिंदे, मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ. अविनाश गोसावी आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ. अविनाश गोसावी आणि मोड्युल व्यवस्थापन डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी, ऊस उत्पादक प्रगतशील शेतकरी, प्राध्यापक वर्ग व मोड्युल विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वृषाली घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अभय पाटील यांनी मानले.