Join us

यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 19:00 IST

गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे हळवे, निमगरव्या वाणाची भातशेती धोक्यात आली आहे. भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार ५७२ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. वरकस जमिनीत १२० ते १३५ दिवसांचे हळवे, निमगरव्या वाणाची लागवड करतात. मळेशेतीमध्ये पाण्याची उपलब्धता असल्यामुळे गरव्या वाणाची लागवड केली जाते. दरवर्षीपेक्षा यावर्षी दहा दिवस आधी पाऊस सुरू झाला.

दि. २० मेपासूनच पावसाने हजेरी लावली. पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पेरणी विलंबाने करावी लागली. काही ठिकाणी पावसामुळे पेरण्या रुजल्याच नाहीत, त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते. रोपे उगवल्यानंतर लागवडीच्यावेळीही पाऊस गायब होता. परिणामी पंपाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी लागवडीची कामे उरकली.

हळवे भात गणेशोत्सवात पसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. पाऊस भरपूर असल्यामुळे फुलोराच धुवून काढला. त्यामुळे दाणे भरण्याऐवजी पोकळ राहिल्याने उत्पादकता घटणार आहे. सध्या निमगरवे (मध्यम) वाणाचे भात पसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेले काही दिवस पावसाचे सातत्य कायम आहे.

सकाळच्या सत्रातच भरपूर पाऊस असल्याने आता निमगरव्या वाणाची भातशेतीही धोक्यात आली आहे. सद्यस्थितीत ४० टक्के भाताची उत्पादकता घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. गरव्या वाणासाठी मात्र सध्याचा पाऊस पोषक आहे. दमट हवामानामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना, पावसामुळे किडी वाहून जात असल्या तरी दाणे भरत नसल्यामुळे उत्पादकता घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

विमा संरक्षणाबद्दल शेतकऱ्यांत नाराजी

जिल्ह्यातील उंबरठा उत्पादनाचर भातासाठी नुकसान भरपाई निश्चित केली जाते. मात्र, उंबरठा उत्पादन जास्त असल्यामुळे विमा कंपन्याही परतावा देत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भात पिकासाठी विमा कवच घेण्याबाबत नकारात्मकता आहे.

उत्पादकतेत घट

कधी अतिवृष्टी तर कधी गायब तर कधी दमट हवामान एकूणच विचित्र हवामानामुळे शेतकरी कमी दिवसाच्या वाणाची निवड करतात. परंतु, ऐन पसवण्याची वेळीच पावसाचा जोर वाढत असल्यामुळे उत्पादकता धोक्यात येऊ लागली आहे. भात पेरणीपासून लागवडीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. मात्र, खर्चाएवढीसुद्धा उत्पादकता मिळत नसल्यामुळे भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होऊ लागला आहे.

जिल्ह्यातील लागवडीचे क्षेत्र

तालुका लागवडीखालील क्षेत्र (हेक्टर)
मंडणगड३७३० 
दापोली ५७०० 
खेड १०५३० 
चिपळूण ९८४१ 
गुहागर ५४१२ 
संगमेश्वर ११४५० 
रत्नागिरी ६९३८ 
लांजा ९२७१ 
राजापुर ८६०० 
एकूण ७०५७२ 

गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला असून त्यामुळे हळवे व निमगरवे भात पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भात फुलोऱ्यात असतानाच पाऊस मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लोंबी पोकळ होण्याचा धोका आहे. ४० टक्के भाताची उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. - डॉ. नीलेश सोनोने, अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव.

हेही वाचा : गोठ्यातील स्वस्त, सोपा आणि सुरक्षित स्वच्छतेचा उपाय; ‘हे’ रसायन ठरतंय रोगराईवर रामबाण पर्याय 

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतकरीशेतीरत्नागिरीपाऊसपीकसरकार