lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार

40 percent of agricultural feeders will be solar powered to provide electricity to farmers during the day | शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार

यात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे.

यात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील कृषी क्षेत्रासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे ९ हजार मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यातून ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकारपत्र आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती.

त्यानंतरच्या काळात २ हजार मे.वॉट पर्यंत निर्मिती करण्यात आली. आता ९ हजार मे.वॉट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे ४० टक्के कृषी फीडर हे सौरऊर्जेवर येतील.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची दिवसा वीजेची सातत्याने मागणी होती. ही मागणी आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन शक्य होणार आहे. सर्वांत आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राळेगणसिद्धी जि. अहमदनगर येथे साकारण्यात आली. ती कमालीची यशस्वी झाली. आता जागा उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेने केलेल्या भरीव कार्यामुळे हे शक्य झाले. विकासकांना यापुढेही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील. कुठेही अडचण आल्यास त्या सोडविण्यासाठी शासन कायम पाठीशी असेल.

राज्यात ३६०० मेगॅवॉट सौर ऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे. पण, आता अवघ्या ११ महिन्यात ९००० मेगॅवॉटची प्रक्रिया राबवून सरकारने एक नवा विक्रम घडविला आहे. सरकारने कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध केल्याने हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य झाले आहे.

या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. हा प्रकल्प १८ महिन्यात पूर्ण करायचा असला तरी सोबत काम केले तर १५ महिन्यातच तो पूर्ण होऊ शकतो.

आता हा प्रकल्प सुरू होणार म्हणून अधिकाऱ्यांनी थांबू नये. उर्वरित ५० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणण्यासाठी नियोजनाच्या तयारीला तत्काळ लागावे. पुढील दोन ते तीन वर्षात ८ लाख सौर ऊर्जा पंपसुद्धा शासनाला द्यावयाचे आहेत, त्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना १.२५ लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे दिले जाते. यावेळी हुडकोसोबत एक सामजंस्य करार सुद्धा करण्यात आला. यामधून ५ हजार कोटी रूपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मिळणार आहेत. रिलायन्ससोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी सामजंस्य करारसुद्धा करण्यात आला. या करारामुळे राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात बुस्ट मिळणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते, तर सभागृहात अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक कादंबरी बलकवडे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदींसह विकासक उपस्थित होते.

Web Title: 40 percent of agricultural feeders will be solar powered to provide electricity to farmers during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.