Join us

पंचगंगा नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी ३४० कोटींचा निधी, कोल्हापूरकरांना..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 08:54 IST

कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर करण्यात आलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण काल एकनाथ शिंदे यांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर करण्यात आलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण काल एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी पंचगंगेच्या प्रदुषणमुक्तीसाठी नदीत जाणाऱ्या उर्वरीत सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रूपयांची मंजूरी देणार असल्याचे सांगत सर्व सांडपाणी शुद्ध होवून पंचगंगा १०० टक्के प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंचगंगेच्या प्रदुषणमुक्तीसाठी मंजूर झालेल्या निधीमुळे शहराच्या खालील गावांना आता अशुद्ध पाण्याचा त्रास होणार नाही. तसेच कोल्हापूर हे आध्यात्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी विविध देवस्थानांचा विकास करण्यासाठी नुकताच 900 कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यास शासनाकडून येत्या अर्थसंकल्पात समावेश करावा,अशी मागणी पालकमंत्री मुश्रीफ यांनी केली.

लोकार्पण झालेल्या विकासकामांमध्ये कोल्हापूर शहरासाठीच्या काळम्‍मावाडी थेट पाईपलाईन प्रकल्पासह शहरातील १०० कोटींचे रस्ते व अन्य विकास कामांचा समावेश आहे. याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उपलब्ध केलेल्या निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पणही यावेळी झाले.

पाच नदीप्रवाहापासून तयार झालेली पंचगंगा

पंचगंगा ही महाराष्ट्रातील महत्वाची नदी आहे. पाच नदीप्रवाहांपासून तयार होणारी म्हणून तिला पंचगंगा म्हटले जाते.कुंभी, तुळशी, कासारी, भोगावती या चार उपनद्या व पाचवी सरस्वती गुप्त नदी मानली जाते. ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे, ती नरसोबावाडी येथे कृष्णेला जोडली जाते. पंचगंगा नदीची एकूण लांबी सुमारे ८१ की. मी आहे.

महाराष्ट्राची पंचगंगा नदी कोल्हापूरच्या हद्दीतून वाहते. याची सुरुवात प्रयाग संगम कोल्हापुर जिल्हयातील करवीर पासून होते. या नदीवर व तिच्या उपनद्यांवर असणारे राधानगरी धरण हे प्रमुख धरण असून कोल्हापूर शहरांसह हजारो गावांची तहान हे धरण भागवते.

टॅग्स :नदीप्रदूषणकोल्हापूरएकनाथ शिंदे