Pune Bird Village : पुण्याच्या नैऋत्येकडे असलेल्या भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव 'पक्ष्यांचं गाव' म्हणून हळूहळू नावारूपास येतंय. याच गावात मागच्या १२ वर्षांपासून पक्ष्यांचे अधिवास जपणं आणि त्यांच्या नोंदी ठेवण्याचं काम इथल्या तरूणांकडून सुरू आहे. इथं सुमारे १९० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या आणि १३० पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात.
स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या पिसावरेला बांदलांचं गाव म्हणून ओळख आहे. ऐतिहासिक वारशासोबतच या गावाला समृद्ध पर्यावरणीय ठेवा लाभला आहे. डोंगरदऱ्या आणि जंगलांमुळे इथे जैवविविधता आढळून येते. त्यामुळे इथे पक्ष्यांच्या आणि फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळून येतात.
पिसावरे गावातील माध्यमिक शाळेचे माजी शिक्षक संतोष दळवी आणि त्यांचे सहकारी धनंजय कोठावळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांची आवड निर्माण केली. २०१३ सालापासून विद्यार्थ्यांना घेऊन पक्षी निरिक्षण करणं, फोटोग्राफी करणं आणि बघितलेल्या सर्व पक्ष्यांच्या, त्यांच्या रंगाच्या आणि सवयीच्या नोंदी ठेवणं त्यांनी सुरू केलं. यातूनच त्यांना पक्ष्यांचे विविध गुणधर्म समजू लागले.
विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी आवड निर्माण होताना पाहून दळवी सरांनी कॅमेरा विकत घेऊन फोटोग्राफी करायला सुरूवात केली. यातून टिपलेल्या छायाचित्रांचं दालन त्यांनी शाळेतच उभारलं. यामुळे पक्ष्यांच्या नोंदी ठेवणं सोपं झालं. शाळेतील पक्ष्यांचा अधिवास बघून त्यांनी चिमण्यांची शाळाही सुरू केली. पण तीन वर्षांपूर्वी दळवी सरांची पिसावरेच्या शाळेतून बदली झाली आणि हे काम याच शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आलं.
पक्ष्यांवरील उपक्रमांना मूर्त रूप देण्यासाठी येथील तरुणांनी ‘फ्रेंड्स सोशल फाउंडेशन’ नावाची संस्था सुरू केली. या माध्यमातून त्यांनी पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास टिकवणं, अधिकृत नोंदी ठेवणं, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणं आणि पक्षी पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करायला सुरूवात केली.
पहिले पक्ष्यांचे गाव!
महाराष्ट्रात साधारणपणे ५६० पक्ष्यांच्या जाती आढळतात आणि २४० फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी पिसावरे गावात १९० पेक्षा जास्त पक्षी आणि १३० पेक्षा जास्त फुलपाखरांची नोंद झालेली आहे. देशात एवढ्या प्रजाती कोणत्याच गावात आढळल्या नाहीत, त्यामुळे एवढ्या प्रजाती सापडणारं हे देशातील पहिलंच पक्ष्यांचं गाव असावं असा दावा येथील स्थानिकांनी केलाय.
पिसावरेला पक्ष्यांचं गाव म्हणून अधिकृत मान्यता मिळण्याची अपेक्षा इथल्या तरूणांना आहे. त्यासाठी फ्रेंड्स सोशल फाउंडेशन आणि ग्रामस्थांकडून प्रयत्न केला जातोय. भविष्यात या गावाला पक्ष्यांचं गाव म्हणून अधिकृत मान्यता मिळाली तर इथलं पर्यावरण, पक्ष्यांचे अधिवास टिकतील, सर्वांगीण विकास होईल आणि तरूणांचं शहरात होणारं स्थलांतर थांबेल अशी भावना या तरूणांचीये.
मुलांना पक्ष्यांबद्दल आवड निर्माण करणं, पिसावरे गावाला पक्ष्यांच्या गावाकडे घेऊन जाण्यासाठी काम करणं आणि शाळेतल्या मुलांपासून सुरू झालेल्या प्रवासाला व्यापक रूप देण्याचं काम दळवी सरांनी केलंय. आज हे काम ग्रामस्थांच्या मदतीने आणि लोकसहभागातून अनिकेत साप्ते, रविशा बरदाडे, सूरज अडसूळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरूये. येणाऱ्या काळात भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव पक्ष्यांचं गाव म्हणून ओळखलं जाईल...!
पक्षी निरिक्षणातून सुरू झालेल्या उपक्रमातून पिसावरे मध्ये चिमण्यांची शाळाही सुरू झाली. यासोबतच काही तरूणांना यामुळे करिअरमध्ये फायदा झालाय. गावातील तरूणांची टीम पक्ष्यांच्या संवर्धनाचा वारसा समर्थपणे पुढे नेताना पाहून आनंद होतो.
- संतोष दळवी (शिक्षक, पक्षी अभ्यासक)
दळवी सरांच्या प्रयत्नातून गावात पक्ष्यांच्या संवर्धनाच्या कामाला सुरवात झाली. पण शासन पातळीवर या कामाला स्थान मिळावं आणि शासनाकडून यासाठी निधी मिळावा आणि या गावाला पक्ष्यांचं गाव म्हणून अधिकृत मान्यता मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- महादेव बांदल (ग्रामपंचायत सदस्य, पिसावरे, ता. भोर)
