वैद्यनाथ कॉलेज व वसंतनगर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाच्या डोंगर कुशीतील अंधार खोळी परिसरात सात दिवस श्रमदान शिबिर राबविण्यात आले. शिबिरात १२५ तरुणांनी सहभाग घेत सात दिवसांत १६ हजार दगडगोटे गोळा करून पाणी अडविण्यासाठी १५ फुटांची भिंत उभी केली. पावसाळ्यात पाझर तलावात ३० लाख लिटर पाणी साठणार असून, तलावामुळे वसंतनगर डोंगरपट्ट्यातील वन्यजीवांना पाणी मिळणार आहे.
श्रमदान शिबिराचा समारोप १४ फेब्रुवारी रोजी झाला. यात दोनशे हातांनी सलग सात दिवस श्रमदान केले. डोंगर-दऱ्यांतून दगड, माती आणून १५ फुटांची भिंत उभी केली. तरुण-तरुणींनी एकएक करत १६ हजार दगड-गोटे गोळा केले. गतवर्षी हा बंधारा वैद्यनाथ कॉलेजच्या तरुणांनी श्रमदान राबवून १२ लाख लिटर क्षमतेचा केला होता. त्या पाण्याचा उपयोग वन्य प्राणी, पशू- पक्षी, पाळीव गायी, म्हशी, शेळ्यांना
झाला. यावर्षी बंधाऱ्याची उंची, खोली व रुंदी श्रमदानातून वाढविली आहे. त्याची क्षमता आता तीस लाख लिटर झाली आहे.
या जलकुंभास जवाहर एज्युकेशन सोसायटीचे सचिव दत्ताप्पा ईटके, प्राचार्य डॉ. रमेश राठोड यांनी भेट दिली आहे. ही संकल्पना रासेयो संयोजक प्रा. डॉ. माधव रोडे, सखाराम नाईक, प्राचार्य अरुण पवार, सरपंच विजय राठोड यांची होती. यात प्रा. डॉ. भीमानंद गजभारे, प्रा. दिलीप गायकवाड, प्रा. डॉ. श्रीहरी गुट्टे, विश्वजीत हके, सौरभ सातपुते, राम फड, दिव्या भोयटे, अर्पणा ओपळे, अभिषेक रोडे, आरती शिंदे, नेहा आदोडे, कीर्तिश्वर गित्ते, कृष्णा रोडे, ज्ञानेश्वर मुंडे, योगेश ढाकणे सहभागी झाले होते. वन विभागाच्या डोंगर कुशीत श्रमदानातून तयार केलेल्या जलकुंभ परिसरात जून महिन्यात अंकुर बीज बँकेतील बीजारोपण करून वृक्ष निर्मिती करण्यात येणार आहे.
१२५ तरुणांनी ६ हजार दगडगोटे केले गोळा, श्रमदानातून बांधला ३० लाख लिटर क्षमतेचा पाझर तलाव
