कुक्कुटपालनात पावसाळ्यात पक्ष्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोंबड्यांना पावसाळ्यात विविध आजार होतात. व्यवस्थापनात योग्य वेळी, योग्य ते बदल न केल्यास, त्याचा परिणाम कोंबड्यांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो.
पावसाळ्यात बैठक व्यवस्थेची व स्वच्छतेची कशी घ्याल काळजी
- गादी पद्धतीने संगोपन करण्यात येणाऱ्या पक्षीगृहात पक्षांना बसण्यासाठी उंच प्लॅटफॉर्म असावेत. त्यामुळे जमिनीतील ओलाव्यापासून पक्षांचे संरक्षण होईल. तसेच त्यांच्या पायांना इजा होणार नाही आणि त्यास संसर्गही होणार नाही.
- पक्षांच्या गर्दी करण्यामुळे, छताच्या गळतीमुळे तसेच हगवण या कारणांमुळे पक्षीगृहातील गादीचे तूस ओले होण्याची शक्यता असते.
- तसेच पक्षीगृहातील गाद्यांचे पेंड पडू शकते. त्यामुळे पक्षांच्या पायांना जखमा होण्याची शक्यता असते. यासाठी पक्षीगृहातील पक्षांची संख्या नियंत्रित ठेवावी.
- पक्षाच्या गादीचा सामू ७.० च्या खाली राखल्यास अमोनिया वायू निर्मिती कमी होते. हा सामू ८.० च्या वर गेल्यास गादीचे लिटर मध्ये सुपर फॉस्फेट मिसळता येईल (१.०९ कि.ग्रॅ. प्रती १०.५ वर्ग फुटासाठी) ज्यामुळे अमोनिया वायू कमी प्रमाणात उत्पन्न होईल.
- पक्षांचे लसीकरण वेळापत्रकानुसार करण्यात यावे. पक्षांना जंतनाशके/कृमीनाशके औषधी द्यावीत.
- पक्षीगृहात माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पक्षीगृहाची नियमित स्वच्छता करावी.
- वातावरणातील तापमान सरारारी तापमानापेक्षा कमी असल्यास पक्षीगृहात तापमान उबदार रहावे यासाठी उष्णतेची सोय करावी.
- दिवस लवकर मावळणे किंवा ढगाळ वातावरणामुळे लवकर अंधार होणे या बाबीमुळे अंडी उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, यासाठी १२ ते १४ तासापर्यंत कृत्रिम प्रकाश उपलब्ध करावा जेणेकरून अंडी उत्पादन सुरळीत राहील.
- पावसाळ्यात परसातील कुक्कुट पालनाद्वारे संगोपन करण्यात येणाऱ्या कोंबड्या खुडुक होण्याची शक्यता असते. त्यासाठी अशा कोंबड्याखाली प्रति कोंबडी १२ ते १५ अंडी उबवणुकीसाठी ठेवावीत.
- परसातील कुक्कुटपक्षी पावसामुळे साचलेल्या पाण्यात वावरल्यामुळे पायास चिखल लागू शकतो. या चिखलाद्वारे पक्षीगृहात, खुराड्यात रोगजंतुंचे संक्रमण होऊ शकते. यासाठी पक्ष्यांना बाहेर सोडल्यास पक्षीगृहांची स्वच्छता करावी.
- शक्य असल्यास पावसात पक्षांना बाहेर सोडू नये. खुराड्यातचं खाद्य व पाण्याची व्यवस्था करावी. परसातील कुक्कुटपालनाद्वारे संगोपन केल्या जाणाऱ्या कोंबड्या पाऊस सुरू झाल्यास पक्षीगृहात परत येतील याची दक्षता घ्यावी.
- कोंबड्या आजारी असल्याची शंका आल्यास पशवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. उघड्यावर मृत कोंबड्या टाकू नयेत तसेच मृत कोंबड्यांची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी.
अधिक वाचा: पावसाळ्यात कुक्कुटपालनातील रोग प्रतिबंधासाठी कसे कराल शेड व खाद्याचे व्यवस्थापन?