नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूची लागण झाल्यानंततर १५ दिवसांत १५ पोल्ट्री फार्ममधील लाखो पक्षी, अंडी आणि पशुखाद्य नष्ट करण्यात आले. त्यात जवळपास १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, येत्या आठवड्यात केंद्रीय पथक येथे भेट देणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ९० दिवस अर्थात आणखी ७५ दिवस पोल्ट्री उद्योग बंद राहणार आहे.
नवापुरातील बर्ड फ्लूचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला आहे. सुरुवातीला अहवाल आल्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत तीन टप्प्यांत कोंबड्या व अंडी नष्ट करण्याची मोहीम राबविली, शिवाय शेकडो पशुखाद्यदेखील टन नष्ट करण्यात आले.
निर्जंतुकीकरण सुरू
• या संसर्गाचा इतर पोल्ट्री फार्ममध्ये प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या पथकांकडून सखोल तपासणी आणि निर्जतुकीकरण प्रक्रिया राबवली जात आहे.
• केंद्रीय पथकाकडून पाहणी करून नुकसान, त्याची भरपाई आणि इतर अनुषंगीक बाबींसदर्भात चर्चा होईल.
चार लाख कोंबड्या आणि २४ लाख अंडी नष्ट...
• गेल्या १५ दिवसांत केलेल्या कार्यवाहीनुसार एकूण १५ पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्या बाधीत झाल्या होत्या. त्यातील चार लाख सहा हजार ६८२ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या शिवाय २४ लाख ९१ हजार ७२३ अंडी देखील नष्ट करण्यात आली. पोल्ट्रीमध्ये असलेले पाच लाख ४८ हजार ९५८ किलो पशुखाद्य नष्ट केले गेले.
• अहवाल आल्यानंतर २० दिवसांसाठी पोल्ट्री बंद करण्यात येते. काही पोल्ट्रींचा अहवाल हा १५ दिवसांपूर्वी आल्याने त्या पोल्ट्रींचा व्यवसाय आणखी ७५ दिवस बंद राहणार आहे. तर नुकताच अहवाल आलेल्या पोल्ट्रींचा व्यवसाय हा संपूर्ण २० दिवस बंद राहणार असल्याने उलाढालीवर परिणाम होणार आहे.
टप्प्याटप्प्याने आले बर्ड फ्लूचे अहवाल...
• टप्प्याटप्प्याने अहवाल येत गेल्यानंतर १५ दिवसांत, १५ पोल्ट्रीमध्ये कारवाई करण्यात आली. नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा पहिला अहवाल ३० एप्रिलला आला होता.
• त्यावेळी एक किलोमीटरच्या परिघात कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. पहिल्या टप्प्यात, १२ पोल्ट्री क्षेत्रांपैकी ९ पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या नष्ट करण्यात आल्या.
• दुसऱ्या टप्प्यात ७ पोल्ट्री क्षेत्रांपैकी ४ पोल्ट्री फार्ममध्ये कारवाई करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात, नवापूर शहराजवळील लहान चिंचपाडा भागातील अहवाल पॉझिटिव्ह येताच तेथेही दोन पोल्ट्रीमधील कोंबड्या नष्ट करण्यात आल्या.
