नाशिक : राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून ऊस तोडणीला परवानगी दिली असली, तरी मालेगाव तालुक्यात पावसामुळे सध्या ऊसतोडणीला अडचणी येत आहेत. शेतात चिखल आणि पाणी साचल्याने तोडणी सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामावर सुरुवातीपासूनच परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूर्वी तालुक्यात सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होत होती, ती आता केवळ १५० हेक्टरपर्यंत मर्यादित राहिली आहे. रावळगाव साखर कारखाना हा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार होता.
गळीत हंगामात केवळ मालेगावच नव्हे, तर आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकरीही येथे ऊस आणत असत. मात्र, पिकांच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे उसाकडे दुर्लक्ष झाले. तरीदेखील यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यात पुन्हा उत्साहाचे वातावरण आहे. पावसामुळे चिखल आणि ओलावा ऊसतोडणीसाठी अडथळा ठरत असला, तरी यंदाचा हंगाम ऊस उत्पादकांसाठी आशावादी ठरू शकतो.
साखर कारखान्याला उसाची प्रतीक्षा
रावळगाव साखर कारखान्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या बॉयलर आणि मशिनरीची ९५ टक्के तयारी पूर्ण झाली आहे. सर्व यंत्रणांची २ ते ३ वेळा चाचणी घेण्यात आली असून, आता कारखाना शेतकऱ्यांच्या ऊस प्रतीक्षेत आहे. या वर्षी कारखान्याकडे चाळीसगाव, साक्री, निफाड आणि कसमादे परिसरातून तब्बल ३ लाख टन ऊस येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम
कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत असतो. मात्र, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ऊस तोडणीला मोठा विलंब झाला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तसेच निफाड तालुक्यात ऊस तोडणीसाठी आलेल्या सुमारे २,५०० ऊसतोड मजुरांनी ठिकठिकाणी तळ ठोकला आहे. मात्र, शेतात पाणी व ओलसर परिस्थितीमुळे प्रत्यक्ष तोडणी कार्य सुरू करता आले नाही. सोमवारी काहीशी उघडीप मिळाल्याने निफाड तालुक्यात ऊस तोडणीस प्रारंभ झाला आहे.
ऊसतोड कामगारांना पावसामुळे तंबू व निवारा उभारणे कठीण झाले असून, त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर कादवा कारखाना प्रशासनाने शेड, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शाळा अशा उपलब्ध जागांमध्ये कामगारांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. तसेच विविध गावांतील शेतकऱ्यांनीही शेडमध्ये निवारा देऊन सहकार्य केले आहे.
वाहतुकीला अडचण
पावसामुळे अनेक गावांतील शेतरस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. प्रशासनाने काही ठिकाणी रस्ते सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले, तरी ते अद्याप अपुरे आहेत. त्यामुळे ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर, बैलगाड्यांची ये-जा कठीण होत असून, कारखान्यात ऊस पोहोचण्यात विलंब होत आहे.
या वर्षीचा गळीत हंगाम मोठा होणार आहे. ऊस हे हमी पीक आहे आणि त्याचे भाव नेहमी स्थिर राहतात. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस उत्पादनाला प्राधान्य द्यावे. यंदाच्या गळीत हंगामात २५० टोळ्यांची यंत्रणा कार्यरत असल्याने अंदाजे ३ लाख टन उसासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे.
- बबनराव सोपानराव गायकवाड, चेअरमन, रावळगाव कारखाना.
येत्या काळात ऊस उत्पादन वाढावे, यासाठी आम्ही शास्त्रज्ञांच्या मदतीने कार्यशाळा आयोजित करणार आहोत. कारखान्याला पुन्हा ऊर्जा मिळावी आणि उत्पादन वाढावे यासाठी मंत्री भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
- कुंदन चव्हाण, संचालक, रावळगाव साखर कारखाना
