रऊफ शेख
फुलंब्री तालुक्यातील तळेगाव वाडी गावात यंदा खऱ्या अर्थाने लक्ष्मी पावली. कारण येथील शंकरपटात हिंदकेसरी विजेता ठरलेला 'राजा' हा सुप्रसिद्ध बैल तब्बल ८२ लाख रुपयांना विकला गेला आहे. (Hind Kesari bull Raja)
राज्यातील शंकरपट परंपरेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री किंमत ठरली असून, या व्यवहाराने बैलप्रेमींच्या वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.(Hind Kesari bull Raja)
'राजा'चा शंकरपटातील थाट
तळेगाव वाडी येथील शाकेर मजीद खान आणि जाकेर मजीद खान या दोन भावंडांनी लहानपणापासून 'राजा'ला प्रेमाने वाढवले. तीन वर्षांच्या या बैलाने गेल्या दोन हंगामात राज्यातील विविध शंकरपट स्पर्धांमध्ये तब्बल २ हिंदकेसरी आणि १२ पेक्षा जास्त पारितोषिके पटकावली आहेत.
राज्यभरात त्याचा गाजलेला थाट पाहून अनेक बैलशौकिन त्याला विकत घेण्यासाठी उत्सुक होते.
८२ लाखांची अभूतपूर्व विक्री
२० ऑक्टोबर रोजी पुण्यातील पृथ्वी दादा कुठवड आणि बाबूराव अप्पा कामठे या बैलशौकिनांनी स्वतः तळेगाव वाडीला येऊन 'राजा'ची खरेदी केली.
या विक्रीने शंकरपट क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पूर्वी याच गावातील 'चिमण्या' नावाच्या बैलाची ६४ लाखांपर्यंत विक्री झाली होती; मात्र 'राजा'ने ती किंमत मागे टाकली.
मालकांचा अभिमान, खरी मेहनत
शाकेर खान सांगतात, राजा आमच्यासाठी फक्त बैल नव्हता, तो आमच्या कुटुंबाचा अभिमान होता. त्याच्या संगोपनासाठी आम्ही सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याच्या आहारापासून ते प्रशिक्षणापर्यंत प्रत्येक बाबतीत विशेष काळजी घेतली.
नव्या खरेदीदारांनी सांगितले की, आमच्या वडिलांना शंकरपटाची आवड आहे. त्यामुळे 'राजा'ला आमच्याकडे आणले आहे. तो पुढेही विविध शंकरपट स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे.
'राजा'ची कीर्ती राज्यभर
मुंबई, पुणे, सांगली, सातारा यांसारख्या जिल्ह्यांतील शंकरपट मैदानांवर 'राजा'ने वर्चस्व गाजवले आहे. त्याच्या ताकदीने आणि वेगाने प्रेक्षकांची मने जिंकली असून, शंकरपटप्रेमींमध्ये त्याच्या खरेदीसाठी अक्षरशः चुरस लागली होती.
