अमरावती :शेतीला पूरक म्हणून मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला दुग्ध व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे.(Dairy Farming)
वाढती महागाई, पशुखाद्याच्या किमतींतील मोठी वाढ, चाराटंचाई आणि दुधाला मिळणारा स्थिर दर यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.(Dairy Farming)
गेल्या सहा महिन्यांपासून दुधाच्या खरेदी दरात कोणतीही वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचा तोटा वाढत चालला आहे.(Dairy Farming)
दुहेरी संकटात दुग्ध उत्पादक
एकीकडे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हा जोडधंदाच तोट्याचा ठरत आहे.
पशुखाद्य, कडबा, सरकी पेंड, कुटार यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे, तर दुधाचे दर स्थिर असल्याने खर्च आणि उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
उन्हाचा फटका; उत्पादनात घट
जिल्ह्यात तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने जनावरांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. उष्णतेमुळे जनावरांची भूक कमी होते, पचनशक्ती मंदावते आणि परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी कमी झाले आहे.
चाराटंचाईने वाढवली अडचण
वाढत्या उष्णतेमुळे विहिरी, नदी-नाले आटले आहेत. हिरवा चारा पिकवणे कठीण झाले असून, बाजारातील चाऱ्याचे दर दुप्पट-तिप्पट झाले आहेत. त्यामुळे जनावरांचे पोट भरणेही कठीण झाले आहे. याचा थेट परिणाम दुग्ध उत्पादनावर आणि व्यवसायाच्या टिकावावर होत आहे.
देखभाल खर्चात मोठी वाढ
सरकी पेंड : सुमारे १,९०० रुपये प्रति बॅग
गोरस पशुखाद्य : १,२०० रुपये प्रति बॅग
तुरीची चुरी : १,५०० रुपये प्रति बॅग
हरभरा कुटार : ६०० रुपये प्रति बॅग
या वाढलेल्या दरामुळे जनावरांच्या देखभालीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कडबा आणि गहू भुस्सा यांचे दरही दुपटीने वाढले आहेत.
दुधाला मिळणारे दर (सध्यस्थिती)
गायीचे दूध : ४४ रु. ते ४५ रु. प्रति लिटर
म्हशीचे दूध : सुमारे ७० रु. प्रति लिटर
हे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपुरे असल्याने दुग्ध उत्पादकांमध्ये नाराजी वाढत आहे.
जोडधंदा ठरतोय तोट्याचा
शेतीतील वाढता खर्च, निसर्गाचा फटका आणि कमी उत्पन्न यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसायातूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हा व्यवसाय बंद करण्याचा विचार काही जण करत आहेत.
शेतकऱ्यांची मागणी
दुग्ध व्यवसाय वाचवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, पशुखाद्यावर अनुदान द्यावे आणि दुधाच्या खरेदी दरात वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत दुग्ध व्यवसाय टिकवणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. खर्च वाढ आणि उत्पन्न कमी यामुळे हा व्यवसाय तोट्यात जात असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर : Fodder Shortage : '३७७ दिवस चारा पुरेल' दावा फोल? पशुपालक मात्र चिंतेत!
अधिक वाचा : Jamin Kharedi : जमीन खरेदीत एक चूक करेल मोठं नुकसान; जाणून घ्या कायदा काय सांगतो
