Join us
Daily Top 2Weekly Top 5

Traditional Fishing आता खाडीकिनारी पारंपरिक मच्छिमारी सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:17 IST

गावातील खाडीकिनारी खडकी मासेही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळत असतात. यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छिमारी व्यवसायाला पावसाळ्यामध्ये सुगीचे दिवस असतात.

देवगड तालुक्यामध्ये मत्स्य व आंबा व्यवसाय या दोन व्यवसायावर देवगडची आर्थिक नाडी अवलंबून असते. यावर्षी मत्स्य व्यवसाय तोट्यातच गेल्याचे सांगण्यात येत आहे. परप्रांतीय गुजरात व मलपी मधून फास्टर ट्रॉलरचा अतिक्रमणामुळे स्थानिक मच्छिमारांना फटका बसत आहे.

१ जून ते ३१ जुलै हा कालावधी शासनाने मच्छिमारी बंद केली आहे. यामुळे आता खाडीकिनारी पारंपरिक पद्धतीने मच्छिमारी केली जाणार आहे. यावर्षी मच्छिमारी प्रामुख्याने ऑक्टोबरपासून करण्यात आली. सुरुवातीला डिसेंबर महिन्यापर्यंत म्हाकूल ही मासळी मिळत होती.

यानंतर दोन ते तीन महिने मच्छिमारांना बोटीसाठी लागणारा डिझेल खर्च देखील मासेमारी करून मिळत नव्हता, यानंतर एप्रिल व सध्या मे महिन्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात कोळंबी मिळू लागली. यामुळे थोड्याफार प्रमाणात मच्छिमारांना दिलासा मिळाला होता. मात्र यावर्षी एकंदरीत मत्स्य मोसमाचा विचार केला गेला तर, उत्पादनापेक्षा खर्च जास्त अशी बहुतांश मच्छिमारांची अवस्था निर्माण झाली आहे.

विशेषत परप्रांतीय ट्रॉलरधारक अतिक्रमण करून समुद्रकिनारी मच्छिमारी करीत असल्यामुळे स्थानिक मच्छिमारांना मासे मिळत नसल्याचे मुख्य कारण आहे. परप्रांतीय मच्छिमारी करणारे ट्रॉलर यांचा समुद्रकिनारी उद्रेक कधी रोखला जाणार, कारवाई केली जाते ती फक्त कागदावर राहते. मत्स्य अधिकाऱ्यांना पैसे मिळविण्यासाठीच परप्रांतीयांचा उद्रेक रोखल्या नंतरच मत्स्य दुष्काळाचा लगाम लागू शकतो.

१ जून ते ३१ जुलैपर्यंत शासनाने पावसाळ्यामधील मच्छिमारीसाठी बंदी घातली असून या बंदी कालावधीमध्ये देवगडमधील मच्छिमार पारंपरिक पद्धतीने म्हणजेच खाडीतील मासेमारी करतात. विशेषतः कांडाळी जाळीच्या सहाय्याने व पाग जाळीच्या सहाय्याने ही मासेमारी केली जाते. देवगड तालुक्यामध्ये अनेक गावांना समुद्र व खाडीचा भाग लागला असल्याने यामुळे बहुतांश या ठिकाणी मच्छिमारी करणारे बांधव आहे.

देवगड, विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये, हुर्शी, कलंबई, पुरळ, फणसे, पडवणे, मिठबांव, तांबळडेग, मिठमुंबरी, तारामुंबरी, मोर्वे, मुणगे, पोयरे, वाडातर, मोंड, विरवाडी, वाघोटण, मणचे, तिर्लोट या गावांना समुद्र व खाडी लाभलेली आहे. याच गावांमध्ये बहुतांश लोक मच्छिमारी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. पावसाळ्यात ते खाडीकिनारी व समुद्रकिनारी मच्छिमारी करून आपला उदरनिर्वाह करतात.

पारंपरिक मच्छिमारीला सुगीचे दिवस• विशेषता करून पावसाळ्यामध्ये सुळामासा, बांदोशी हे मासे मिळतात. सुळामासा हा मधुमेह रुग्णांसाठी आरोग्यासाठी लाभदायक असतो.• विशेषता करून मधुमेहाचा रुग्ण या माशाचे आहारामध्ये सेवन करतात. यामुळे पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या सुळा माश्याला मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांमधून मागणी असते.• गावातील खाडीकिनारी खडकी मासेही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळत असतात. यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छिमारी व्यवसायाला पावसाळ्यामध्ये सुगीचे दिवस असतात.

बोटी सुरक्षित ठिकाणी शाकारल्यासुक्या मच्छिचे भाव मत्स्य बंदी कालावधीमध्ये वधारलेले असतात. विशेषता करून सुकी मासळीमध्ये दोडी, बांगडा, कोलंबी, गोलमा याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पावसाळा सुरू होण्याअगोदरच या मच्छिंची खरेदी करून दोन महिन्यांसाठी तरतूद करून ठेवण्यात येते. सध्या देवगडमध्ये शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच ३१ मेपर्यंतच खोल समुद्रातील मच्छिमारी केली जाणार आहे. काही मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी शाकारून ठेवल्या आहेत. या काळात खलाशीही सुट्टीवर जातात.

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त• १ जून नंतर सर्वच बोटी शाकारून समुद्रकिनारी दोन महिन्यांसाठी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. या कामांची देखील लगबग मच्छिमार बांधवांमध्ये करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मासेमारी व्यवसाय समाधानकारक नसल्यामुळे मच्छिमारी बांधवांच्या चेहऱ्यावर निराशाच दिसून येत आहे.• गेल्या काही वर्षाचा इतिहास पाहता मच्छिमार बांधव आर्थिक संकटातच अडकून राहिले आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांची होत आहे. परप्रांतीय ट्रॉलरचा उदेक व अनेक वादळामुळे मत्स्य व्यवसायावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

- अयोध्याप्रसाद गावकरदेवगड

अधिक वाचा: Fishery बदलत्या हवामानामुळे मासेमारी व्यवसाय खातोय 'हेलकावे'

टॅग्स :मच्छीमारकोकणपाणीपाऊसरत्नागिरी