सध्या मातीमधील शेती सर्वांना माहिती असते; परंतु आधुनिक पद्धतीने वेगळ्या पद्धतीची शेती समोर येत आहे. त्यामध्येच आता 'सी वीड' शेतीचा पर्याय समोर आलेला आहे.
समुद्राकाठच्या खास करून महिला यामध्ये काम करत आहेत. त्यातून त्यांच्या घराची आर्थिक स्थितीदेखील मजबूत होत आहे. या शेतीमधून महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. त्या शेतीविषयी जाणून घेऊ या!
'सी वीड' किंवा समुद्री शेवाळे हा समुद्री परिसंस्थेचे संतुलन करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. भूतलावर पसरलेल्या अथांग सागरात १० हजार प्रकारच्या शेवाळाच्या प्रजाती आहेत.
त्यामध्ये असलेल्या रंगद्रव्यानुसार हिरवी, पिवळी व लाल अशा श्रेणीत त्याचे विभाजन केले आहे. त्यातील काही ठरावीक प्रजातींची शेती करून समुद्रात वाढविले जाते. यालाच 'सी वीड फार्मिंग' किंवा शेवाळ शेती म्हणतात.
शेती करून वाढविलेल्या 'सी वीइस'ला फार मोठी जागतिक बाजारपेठ आहे. दरवर्षी तीन कोटी टन 'सी वीड'ची शेती होते व त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल बाजारपेठेत होते. या शेवाळापासून आगार, आल्जिनेट व कॅरागेनिन हे व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे पदार्थ तयार केले जातात.
आपल्या दैनंदिन आयुष्यात, अनेक ठिकाणी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपण हे शैवाल वापरत असतो. सूप, सॅलड ड्रेसिंग, जेली, पुडिंग, कस्टर्ड, मूस आणि सर्व प्रकारच्या आइस्क्रीममध्ये 'सी वीड'ची पावडर वापरलेली असते.
कापड उद्योग, कागद उद्योग, फार्मास्युटिकल व्यवसाय, माइन व बीअर तयार करण्याच्या प्रक्रियेत 'सी वीइस' उपयोगी पडतात. टूथपेस्ट, शॅम्पू, क्रीम, लोशन व अनेक सौंदर्य प्रसाधनांत त्यांचा वापर होतो. खते, पशुखाद्य, रंगद्रव्ये, औषधी व इंधने अशा प्रकारच्या क्षेत्रात त्याला मागणी आहे.
माफक प्रशिक्षण घेऊन समुद्राच्या खाऱ्या पाण्याने ही शेती केली जाते. हे लक्षात घेऊन भारतात १९६४ च्या सुमारास पोरबंदर येथे पहिला प्रयोग झाला व पुढे २००० च्या आसपास भारतात ही शेती विकसित झाली. संशोधन होऊन प्रसार केला गेला.
सध्या भावनगर येथील सीएसआयआर-सीएसएमसीआरआय या संस्थेत संशोधन चालू आहे. भारतात 'सी वीड' फार्मिंगचे काही उद्योग आहेत.
मासे पकडण्याच्या कामांमध्ये महिलांचा सहजपणे सहभाग नसतो. मासे पकडून आणल्यानंतर मासे विक्रीपर्यंतची कामे महिला करतात. पुरुष मासेमारीला गेल्यानंतर महिलांनी सी वीड फार्मिंगला पसंती दिली आहे.
शेवाळ शेतीसाठी दोराला बांधणे, संवर्धन, कापणी करणे, वाळवणे व विक्रीस पाठवणे ही सर्व कामे ती करते. पारंपरिक शेतीपेक्षा ही अपारंपरिक शेती तुलनेने सोपी आहे आणि महिलांच्या दृष्टीने अनुकूल आहे.
ही शेती समुद्रकिनाऱ्यालगत उथळ पाण्यात होते. त्यामुळे या कामात खोल पाण्यातील मासेमारीसारखा धोका नाही. दुसरे म्हणजे या शेतीला दिवसाचा पूर्ण वेळ देण्याची गरज नाही.
स्वतंत्र स्वरूपात व घराजवळ राहून महिला हे काम करू शकतात. तिसरे म्हणजे शेवाळ स्वयं मदत गटांकडून महिलांना प्रशिक्षण देण्याची सोय आहे. शेवाळ उत्पादने तयार करण्यासाठी उत्पादनाची विक्री करण्यासाठी महिला स्वतः कामामध्ये सहभागी होऊ शकतात.
सध्या तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात व अंदमानच्या किनारपट्टीवरील महिला सी वीड शेती करत आहेत. त्यांना रोजगारकाम व शेतीसाठी विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
रोजगारामुळे या महिलांना काही प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. रोजगाराचा उपयोग कुटुंबासाठी करत आहेत. मुलांचे शिक्षण, पुस्तके, फी, गणवेश व स्वास्थ्यासाठी सक्षम झाल्या आहेत.
मिळालेल्या भांडवलाचा उपयोग महिलांनी परिवाराचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी व आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी केला आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत महिलांना शेतात शेतीसाठी साहित्य, बियाणे, संरक्षण व्यवस्था व उत्पादन विक्रीसाठी मदत दिली जाते.
- डॉ. केतकी वैद्य
प्राध्यापक, फर्ग्युसन विद्यालय
अधिक वाचा: आता बँक खातेही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत 'पोर्ट' करणे शक्य होणार; जाणून घ्या सविस्तर
