रेबीज या प्राणघातक आजाराप्रति समाजात जागरूकता वाढवून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर या दिवशी ‘ग्लोबल अलायंस फॉर रेबीज कंट्रोल’ संस्थेमार्फत ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा केला जातो.
रेबीज या विषाणूजन्य आजारावरील प्रतिबंधात्मक लसीचा शोध प्रथमता फ्रेंच सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. लुईस पाश्चर यांनी लावल्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त २८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये सन् २००७ पासून ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी एकोणीसाव्या ‘जागतिक रेबीज दिन २०२५’ ची संकल्पना/थिम ‘आताच कृती करा:तुम्ही, मी आणि समुदाय’ ही ठेवण्यात आली आहे.
यावर्षीची संकल्पना संपूर्ण जगामध्ये श्वानांमार्फत प्रसारित होणाऱ्या रेबीज आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर, आणि समूह पातळीवर अवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे.
रेबीजची ओळख
रेबीज (पिसाळणे) किंवा अलर्क हा १००% जीवघेणा आजार असून यावर उपचार उपलब्ध नाही परंतु हा आजार १००% टाळता येतो. हा जीवघेणा आजार जगामधील सर्व खंडामध्ये आढळून येतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, स्पेन, जपान इत्यादी देशामधून या आजाराचे निर्मुलन झालेले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी सुमारे ५९,००० लोकांचा रेबीज आजाराने मृत्यू होतो व एकूण रेबीज मरतुकीमध्ये ९५% मृत्यू फक्त आशिया व आफ्रिका खंडामध्ये होतात.
भारतामध्ये जवळपास ३६% (२०,०००) लोकांचा दरवर्षी या आजाराने मृत्यू होतो. श्वानदंश होण्याचे प्रमाण १५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये जास्त म्हणजे ४०% आहे. ही महाभयंकर आकडेवारी पाहता लक्षात येते की, हा रोग सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे रोगाविषयी मोठया प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे.
रेबीज हा रोग ‘रॅबडो व्हायरस’ या बुलेट सारख्या विषाणूमुळे होतो. या विषाणूंना चेतापेशीचे व लाळग्रंथीचे आकर्षण असते. विषाणू तुलनेने नाजूक आणि आयोडीन, एसीटोन, साबण, डिटर्जंट, इथर, फॉर्मेलिन, फिनॉल ई. जंतुनाशकांसाठी संवेदनशील आहे.
सुकलेल्या लाळेतील विषाणू काही तासांत मरतात तर ५ डिग्री सेल्सियस मध्ये १ तासात आणि ६० डिग्री सेल्सियसवर ५ मिनिटात नष्ट होतात. हे विषाणू शरीराबाहेर जास्त काळ टिकत नाही. विषाणू थंड प्रतिरोधक असतो आणि ७० डिग्री सेल्सियस तापमानात अनेक वर्षे टिकतो.
रेबीज हा विषाणूजन्य आजार गरम रक्त असणाऱ्या मानवासह सर्व प्राण्यांमध्ये होतो. यामध्ये श्वान (कुत्रा) कोल्हे अधिक संवेदनक्षम तर गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या या मध्यम संवेदनाक्षम आहेत. हा आजार लांडगे, मांजर, सिंह, मुंगुस, वटवाघूळ, माकड इत्यादि प्राण्यांनाही होतो.
रोगाचे प्रमाण मादीपेक्षा नर श्वानांत अधिक असल्याचे दिसून आले आहे. तसेच हा रोग मादीत प्रामुख्याने माजावर येणाच्या कालावधीत अधिक प्रमाणात होत असल्याचे आढळून आलेले आहे.
रेबीज आजाराचे संक्रमण
◼️ वन्यजीव किंवा सिल्व्याटीक रेबीज हा जंगली प्राण्यांमध्ये आढळून येणारा आजार असून यामध्ये कोल्हे, लांडगे, वटवाघूळ, मुंगुस, गिलहरी इत्यादी प्राणी विषाणूंचे संक्रमण करण्यास कारणीभूत ठरतात. वन्यजीव आपआपसात तसेच श्वान व मनुष्यामध्ये रेबीज संक्रमणासाठी कारणीभूत ठरतात.
◼️ रेबीज आजाराने संक्रमित श्वान आणि किरकोळ प्रमाणात मांजर, पाळीव प्राण्यांमध्ये व मानवामध्ये आजाराच्या संक्रमणास कारणीभूत ठरतात.
◼️ लॅटिन अमेरिकेत वटवाघूळ हे रेबीज विषाणूचे साठवणू केंद्र आणि वाहक म्हणून काम करतात व मनुष्य आणि प्राण्यांना संक्रमणास कारणीभूत ठरतात. भारतात वटवाघुळ रोगप्रसार करत नाही.
◼️ रेबीज आजाराची लागण मुख्यत्वे: बाधित प्राण्यांच्या चाव्यातून आणि ताज्या लाळेच्या संपर्कात त्वचेच्या जखमा/आलेल्या श्लेष्मा आवरण दुषित झाल्याने होते. रेबीज (पिसाळणे) या रोगाचा प्रसार प्रामुख्याने भटक्या किंवा मोकाट श्वानांद्वारे होतो. रोग बाधित श्वान, मांजर, पाळीव प्राणी (गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे), जंगली जनावरे (कोल्हा, लांडगा इ.) व वटवाघुळ रोग प्रसारास कारणीभूत ठरतात. सर्वसामान्यपणे ९९% मानवी रेबीज बाधित श्वानांच्या चाव्यातून होतो.
श्वानदंश आजाराची लक्षणे
◼️ रेबीज बाधित श्वान/मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणतः २० ते ३० दिवसात रोगाची लक्षणे दिसतात, परंतु काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.
◼️ श्वानांने चावल्यापासून रोगाची लक्षणे दिसण्याचा कालावधी जनावरांच्या कोणत्या भागास श्वानांने चावा घेतला आहे यावर अवलंबून असतो उदा. डोक्याच्याजवळ चावा घेतला असेल तर रोगाची लक्षणे लवकर दिसतात. याउलट जर पायाकडील भागात चावा घेतला असेल तर लक्षणे उशिरा दिसतात. त्याचप्रमाणे श्वानांने किती ठिकाणी चावा घेतला यावरही रोगाची लक्षणे लवकर किंवा उशिरा दिसणे अवलंबून असते. एका ठिकांणी चावा घेतल्यापेक्षा दोन-तीन ठिकाणी चावा घेतलेल्या जनावरांत रोगाची लक्षणे लवकर दिसून येतात.
◼️ श्वानांत सर्व सामान्यपणे २०-३० दिवसात लक्षणे दिसतात. सतत व भरपूर लाळ गळणे, मालकास न ओळखणे/आदेश न पाळणे, चावा घेण्याची प्रवृत्ती वाढणे, प्रथम घोगरा आवाज येणे व नंतर आवाज बंद होणे, अंधाऱ्या खोलीत जावून कोपऱ्यात/पलंगाखाली लपून बसणे, पाणी न पिणे, पाण्याची भिती निर्माण होणे अशी लक्षणे दिसून येतात. आजाराची तीव्रता वाढल्यानंतर बाधित श्वानांच्या तोडांचा खालचा जबडा लुळा पडणे, जीभ बाहेर येणे आणि असे श्वान ३-७ दिवसात दगावणे हि लक्षणे दिसून येतात.
◼️ गायी-म्हशीमध्ये बाधित श्वानदंश झाल्यानंतर १५ ते २० दिवसांत लक्षणे दिसून येतात. बाधित जनावरे आक्रमक होतात व माणसावर धावून जातात. शिंगे व डोके झाडावर किंवा भिंतीवर घासतात, सारखे हंबरतात व त्यांचा आवाज घोघरा होतो. तोंडातून भरपूर लाळ गळत राहते, डोळे लालबुंद होतात, जनावर वारंवार लघवी करतात व शेन टाकतात, चारा-पाणी बंद करतात. साधारणपणे लक्षणे दिसू लागल्यापासून २-३ दिवसांत अशी जनावरे दगावतात.
◼️ रेबीजग्रस्त श्वानदंश मनुष्यात झाल्यानंतर साधारणतः १० ते ९० दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. तीव्र डोकेदुखी, थकवा, अस्वस्थता, निद्रानाश आणि स्थानिक वेदना, अतिसंवेदनशीलता, विचित्र वर्तन, ओकारी आल्यासारखी वाटणे, नाका-डोळ्यातून पाणी वाहने/गळणे, घशाला कोरड पडणे, जेवण करणे व पाणी पिणे बंद होणे पाण्याची भिती (हायड्रोफोबीया) आणि शरीरभर लुळेपणा येऊन साधारणत: ७ दिवसात मृत्यू येणे यासारखी लक्षणे दिसतात.
रेबीज आजाराचे निदान
◼️ जीवंत जनावर किंवा माणसात करण्यासाठी कोणतीही चाचणी उपलब्ध नसून उपलब्ध माहिती आणि लक्षणांच्या आधारे प्राथमिक निदान केले जाते.
◼️ जनावरास किंवा मनुष्यास श्वानदंश झाल्याची व चावा घेणारा श्वान साधारणता ४-१० दिवसात मृत्यू पावल्याची माहिती या रोगाचे निदान करण्यास सहाय्यभूत ठरते.
◼️ खूप लाळ गळणे, वेडेपणा येणे, चावा घेणे, पांगळेपणा येणे यासारखी लक्षणे या रोगाचे निदान करण्यास पुरेसे आहेत. या रोगाने जनावर मृत्यू पावल्यास त्याच्या मेंदूची प्रयोगशाळेत तपासणी करुन रोगाचे पक्के निदान करता येते.
श्वानदंश झाल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी करावयाची उपाययोजना
◼️ रेबीज रोग झाल्यावर कसल्याही स्वरूपाचा उपचार उपलब्ध नाही, परंतु श्वानदंश झाल्यानंतर जखमेची योग्य काळजी घेतली व श्वानदंश प्रतिबंधक लस (पोस्ट बाईट व्हॅक्सीन) दिली तर या प्राणघातक रोगापासून बचाव करता येतो.
◼️ श्वानाने चावा घेतलेली जखम त्वरित किमान १५ मिनिटे साबण व भरपूर पाणी वापरून स्वच्छ करावी. त्यानंतर अल्कोहोल किंवा पोव्हीडाइन आयोडीन सारखे जंतुनाशक लावावे. जखमेस टाके घालू नयेत तसेच पट्टी बांधू नये.
◼️ श्वान दंश झाल्यानंतर तात्काळ श्वानदंश प्रतिबंधक लस देऊन घ्यावी. रेबीज प्रतिबंधात्मक लसीचे इंजेक्शन श्वानदंश झालेल्या दिवसापासून ०,३,७,१४ व २८ व्या दिवशी देऊन घ्यावीत. क्वचित श्वानदंश झाल्यानंतर लगेच या लसीचा कोर्स सुरु करता आला नाही तर लस उपलब्ध झाल्यावर तात्काळ सुरु करावा. या लसीचे इंजेक्शन शक्यतो वेळापत्रकाप्रमाणे देऊन घ्यावीत.
◼️ श्वानांमधील रेबीज नियंत्रित केल्यास मानवातील रेबीजला आळा घालता येवू शकतो. म्हणून श्वानांचे नियमित लसीकरण हाच रेबीज रोग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाय आहे. सर्व श्वानांना वयाचे ३ महिने झाल्यावर रेबीज प्रतिबंधक लसीची त्वचेखाली पहिली मात्रा व तदनंतर नियमितपणे दरवर्षी लस टोचून घ्यावी.
◼️ उच्च जोखमीच्या व्यावसायिक गटातील व्यक्तींनी (पशुवैद्यक आणि प्राणी हाताळणारे त्यांचे कर्मचारी, रेबीज संशोधक आणि काही प्रयोगशाळा कामगार मांजरी, श्वान इत्यादींच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती, आंतरराष्ट्रीय प्रवासी) प्रतिबंधात्मक लस घ्यावी. प्रथम वेळी ०, ७ व २१/२८ व्या दिवशी अशा तीन मात्रा घ्याव्यात व तिथूनपुढे दरवर्षी बुस्टर डोस घ्यावा.
◼️ मनुष्यातील श्वानदंश टाळण्यासाठी प्रयत्नशील रहावे. बाहेर फिरताना लोकांनी सावध रहावे, आणि भटक्या श्वानाशी जबाबदारीने वागावे. रेबीज झालेल्या श्वानाला कसे ओळखावे ते शिकावे.
◼️ श्वानांच्या शरीराची भाषा जाणून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत श्वानांना घाबरून पळू नये, किंचाळू नये किंवा श्वानांवर काहीही फेकू मारू नये.
◼️ झोपलेल्या, खाणाऱ्या किंवा पिल्लांची काळजी घेणाऱ्या श्वानास त्रास देऊ नये. गुरगुरणारा श्वान जवळ आल्यावर पळून न जाता त्याऐवजी स्थिर उभे रहावे. आपले हात खाली व शरीराच्या जवळ ठेवावेत. शक्यतो जमिनीकडे पहावे व श्वानाशी थेट नजर टाळावी.
- रविंद्र जाधव
सहाय्यक प्राध्यापक
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा
९४०४२७३७४३