भारतामध्ये दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्या यांच्यावर आधारित हा व्यवसाय लाखो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. दुग्धव्यवसाय यशस्वी होण्यासाठी जनावरांचे आरोग्य, योग्य संगोपन व संतुलित पशुआहार या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
यामध्ये पशुआहार (Cattle Feed) हा सर्वात निर्णायक घटक मानला जातो. योग्य प्रमाणात व योग्य घटकांपासून तयार केलेला पशुआहार जनावरांच्या वाढीस, दूध उत्पादनास, प्रजनन क्षमतेस व रोगप्रतिकारक शक्तीस मोठ्या प्रमाणात मदत करतो.
आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच जनावरांना चारा देतात.
मात्र बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि अधिक दूध उत्पादनाच्या अपेक्षेमुळे वैज्ञानिक पद्धतीने संतुलित पशुआहार देणे आवश्यक झाले आहे. या लेखामध्ये पशुआहाराचे महत्त्व, त्याचे घटक, प्रकार, तयार करण्याची पद्धत, फायदे, काळजी व आर्थिक दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
पशुआहार म्हणजे काय?
जनावरांच्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा, प्रथिने, चरबी, खनिजे, जीवनसत्त्वे व पाणी योग्य प्रमाणात पुरवणाऱ्या खाद्य घटकांच्या मिश्रणाला पशुआहार असे म्हणतात. पशुआहार हा केवळ पोट भरण्यासाठी नसून जनावरांच्या शरीरातील सर्व जैविक क्रियांना चालना देण्यासाठी आवश्यक असतो.
योग्य पशुआहारामुळे काय फायदे होतात?
• दूध उत्पादनात वाढ होते.
• दूधातील फॅट व एसएनएफ (SNF) वाढते.
• जनावरांचे वजन संतुलित राहते.
• रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
• प्रजनन कार्य सुधारते.
पशुआहाराचे महत्त्व
• दूध उत्पादन वाढीसाठी : संतुलित पशुआहार दिल्यास जनावरांकडून जास्त व दर्जेदार दूध मिळते.
• आरोग्य राखण्यासाठी : योग्य आहारामुळे अपचन, ऍसिडिटी, दूध ताप, लंगडी, प्रजनन विकार यांचा धोका कमी होतो.
• प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी : वेळेवर हीट येणे, गर्भधारणा होणे व निरोगी वासराचा जन्म यासाठी आहार महत्त्वाचा असतो.
• आर्थिक लाभासाठी : कमी खर्चात जास्त उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढते.
पशुआहाराचे मुख्य घटक
(पशुआहारामध्ये पुढील प्रमुख पोषक घटक असतात.)
• कार्बोहायड्रेट (ऊर्जा) : जनावरांच्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा कार्बोहायड्रेटमधून मिळते. मका, ज्वारी, बाजरी, गहू कोंडा, तांदूळ कोंडा इ. घटक ऊर्जा पुरवतात.
• प्रथिने (Protein) : दूध निर्मिती, स्नायूंची वाढ व शरीर दुरुस्तीसाठी प्रथिने आवश्यक असतात. सोयाबीन पेंड, कपाशी पेंड, रेपसीड पेंड, सूर्यफूल पेंड हे प्रमुख प्रथिन स्रोत आहेत.
• चरबी (Fat) : चरबीमुळे अतिरिक्त ऊर्जा मिळते तसेच दूधातील फॅट वाढण्यास मदत होते. मोलॅसेस, तेलबिया पेंड यामध्ये चरबीचे प्रमाण असते.
• खनिजे (Minerals) : कॅल्शियम, फॉस्फरस, मीठ, झिंक, कॉपर इ. खनिजे हाडे मजबूत ठेवण्यासाठी व प्रजननासाठी आवश्यक असतात.
• जीवनसत्त्वे (Vitamins) : Vitamin A, D, E, K ही जीवनसत्त्वे जनावरांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
पशुआहाराचे प्रकार
• कोरडा चारा : गहू काड, भात पेंढा, ज्वारी कडबा.
• हिरवा चारा : नेपियर गवत, मका चारा, बरसीम, लुसर्न.
• एकसंध (Concentrate) पशुआहार : हा आहार प्रामुख्याने ऊर्जा व प्रथिनांनी समृद्ध असतो. बाजारात उपलब्ध रेडीमेड पशुआहार किंवा स्वतः तयार केलेला मिश्र आहार यामध्ये याचा समावेश होतो.
संतुलित पशुआहाराची गरज
संतुलित पशुआहार म्हणजे जनावराच्या वय, वजन, दूध उत्पादन व अवस्थेनुसार आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणे. जास्त किंवा कमी आहार दिल्यास नुकसान होऊ शकते. उदा. : जास्त प्रथिने → खर्च वाढतो, पचन बिघडते., कमी ऊर्जा → दूध उत्पादन घटते.
पशुआहार तयार करताना घ्यावयाची काळजी
• कच्चा माल स्वच्छ व बुरशीमुक्त असावा
• योग्य प्रमाणात घटक मिसळावेत
• आहार कोरड्या व हवेशीर ठिकाणी साठवावा
• जुना व खराब आहार वापरू नये
पशुआहार व दूध उत्पादनातील संबंध
अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की संतुलित पशुआहार दिल्यास १५-२५% पर्यंत दूध उत्पादन वाढू शकते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते तसेच जनावरांचे आयुष्य वाढते.
फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी पशुआहार व्यवस्थापनाला प्राधान्य देणे गरजेचे
• दुग्धव्यवसायामध्ये पशुआहार हा कणा आहे. योग्य, संतुलित व दर्जेदार पशुआहार दिल्यास जनावरांचे आरोग्य सुधारते, दूध उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते.
• त्यामुळे प्रत्येक दुग्ध उत्पादक शेतकऱ्याने वैज्ञानिक पद्धतीने पशुआहार व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात टिकाऊ व फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी पशुआहार व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे.
डॉ. एस. एम. खुपसे
विषय विशेषज्ञ (पशुधन व्यवस्थापन)
एमजीएम, के. व्ही. के, गांधेली, छ. संभाजीनगर.
