मिरज सोनी (ता. मिरज) येथील शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेले सोन्याचे कर्णवेल शेळ्यांचे पोट फाडून बाहेर काढण्यात आले.
शेळ्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रियेत सोन्याचे दोन कर्णवेल सापडले. मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशु रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.
मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रकाश गाडवे या शेतकऱ्याच्या मुलीने घरात भांडी घासताना तिच्या दोन्ही कानातील काढून ठेवलेल्या सोन्याच्या कर्णवेल खरकट्या पाण्यात पडल्या.
हे खरकटे पाणी त्यांच्या दोन्ही शेळ्यांनी पिले. खरकट्यासोबत त्या कर्णवेलही गिळल्या. कर्णवेल गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेळ्यांनी त्या गिळल्याचा गाडवे यांचा अंदाज होता.
गाडवे यांनी मिरजेच्या शासकीय पशू रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ढोके यांच्याशी संपर्क साधला. गाडवे यांच्या पाच वर्षे वयाच्या दोन्ही शेळ्यांच्या पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर पोटात काहीतरी धातू असल्याचे दिसले.
यामुळे डॉक्टर ढोके यांनी शनिवारी १७ मे रोजी दोन्ही शेळ्यांची पोटाची शस्त्रक्रिया (रुमीनाटॉमी) करून प्रत्येकी २ ग्रॅमचे सुमारे ३० हजार किमतीचे सोन्याचे दोन कर्णवेल बाहेर काढले.
डॉ. ढोके म्हणाले शेळ्या, गाय, म्हैस, बैल हे प्राणी काही खाल्ल्यानंतर रवंथ करतात. त्यांच्या पोटाची रचना चार कप्प्याची असते. या प्राण्यांनी सुई, तार, खिळा, मोळा गिळल्यास त्यांच्या हृदयाला इजा होण्याचा धोका असल्याने अशा वस्तू तातडीने बाहेर काढाव्या लागतात.
मात्र दागिने किंवा अन्य न टोचणाऱ्या वस्तू त्या पोटात राहिल्यास प्राण्यालाही काही त्रास होत नाही. मात्र शेळ्यांनी सोन्याची कर्णवेल गिळल्याने त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही ढोके यांनी सांगितले.
१,१४० रुपये खर्चशस्त्रक्रियेसाठी दोन तास वेळ लागला, प्रत्येकी ७० रुपये व औषधांसाठी ५०० रुपये असा १,१४० रुपयांचा खर्च गाडवे यांना करावा लागला. मात्र, ३० हजाराचे दागिने त्यांना परत मिळाले.
अधिक वाचा: शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर