उन्हाळा हा पशुधनासाठी अत्यंत संवेदनशील काळ असतो. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात मार्च ते जून या कालावधीत तापमान खूप वाढते. या काळात उष्णतेमुळे जनावरांवर हीट स्ट्रेस (Heat Stress) निर्माण होतो.
उष्णतेचा परिणाम दूध उत्पादन, प्रजनन कार्यक्षमता, आरोग्य आणि वाढीवर होतो. योग्य व्यवस्थापन केल्यास या सर्व समस्या मोठ्या प्रमाणावर कमी करता येतात. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
उष्णतेचा जनावरांवर होणारा परिणाम
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्या शरीराला अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे पुढील परिणाम दिसून येतात.
जनावरांचा चारा खाण्याचा प्रमाण कमी होते. दूध उत्पादन कमी होते, जनावरांमध्ये श्वसन दर वाढतो, शरीराचे तापमान वाढते, प्रजनन कार्यक्षमता कमी होते, उष्माघात (Heat stroke) होण्याचा धोका वाढतो, पाण्याची गरज जास्त वाढते.
विशेषतः उच्च दूध देणाऱ्या गायी, म्हशी, वासरे आणि गर्भवती जनावरे ही उष्णतेस जास्त संवेदनशील असतात.
उन्हाळ्यातील गोठा व्यवस्थापन
उन्हाळ्यात गोठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वायुवीजन आणि सावली असल्यास जनावरांना उष्णतेपासून संरक्षण मिळते.
गोठा व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या बाबी
• गोठा पूर्व-पश्चिम दिशेला बांधलेला असावा.• छतावर पांढरा रंग किंवा चूना लावल्यास उष्णता कमी होते.• गोठ्यात पुरेसे वायुवीजन असावे.• गोठ्यात एक्झॉस्ट फॅन किंवा कूलर वापरता येतात.• छतावर गवताचे किंवा पेंढ्याचे आच्छादन ठेवले तर तापमान कमी होते.• गोठ्याच्या आजूबाजूला झाडे लावावीत.• दिवसातून २ ते ३ वेळा गोठ्यात पाणी शिंपडावे.
उन्हाळ्यातील पाणी व्यवस्थापन
उन्हाळ्यात जनावरांना पाण्याची गरज खूप वाढते. पाणी हे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पाणी व्यवस्थापनाचे नियम
• जनावरांना स्वच्छ आणि थंड पाणी सतत उपलब्ध असावे.• दिवसातून ३ ते ४ वेळा पाणी द्यावे.• पाण्याची टाकी सावलीत ठेवावी.• म्हशींना शक्य असल्यास पाण्यात बसण्याची व्यवस्था करावी.• पाणी दूषित नसावे.
उन्हाळ्यातील आहार व्यवस्थापन
उष्णतेमुळे जनावरांचा आहार कमी होतो. त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे.
आहार व्यवस्थापनाचे नियम
• सकाळी लवकर आणि संध्याकाळी चारा द्यावा.• हिरवा चारा अधिक प्रमाणात द्यावा.• कन्सन्ट्रेट फीड संतुलित प्रमाणात द्यावे.• खनिज मिश्रण आणि मीठ द्यावे.• बुरशी लागलेला चारा देऊ नये.• पचनास हलका चारा द्यावा.
उन्हाळ्यातील जनावरांच्या आहाराचे उदाहरण
उन्हाळ्यातील आरोग्य व्यवस्थापन
उन्हाळ्यात अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पशुवैद्यकीय काळजी घेणे आवश्यक आहे.
आरोग्य व्यवस्थापनासाठी उपाय
जनावरांचे नियमित लसीकरण करावे, बाह्य परजीवी (गोचीड, उवा) नियंत्रण करावे, गोठा स्वच्छ ठेवावा, जनावरांना खनिज मिश्रण आणि जीवनसत्वे द्यावीत, आजारी जनावरांना वेगळे ठेवावे, पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
उष्माघात (Heat Stroke) ओळखणे
लक्षणे - जास्त धाप लागणे, शरीराचे तापमान वाढणे, जनावर सुस्त होणे, लाळ येणे, दूध उत्पादन अचानक कमी होणे.
उपाय - जनावराला सावलीत ठेवावे, थंड पाणी पाजावे, शरीरावर थंड पाणी टाकावे, त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
म्हशींसाठी विशेष व्यवस्थापन
• म्हशींना उष्णता जास्त सहन होत नाही. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनात विशेष काळजी घ्यावी.
• म्हशींना पाण्यात बसण्याची व्यवस्था असावी, दुपारी थंड पाण्याने अंघोळ घालावी, सावलीत ठेवावे, पुरेसे पाणी द्यावे.
उन्हाळ्यातील चारा उत्पादन
• उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते. त्यामुळे पुढील पिके घेणे उपयुक्त ठरते.
• मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लुसर्न. ही पिके जनावरांना पौष्टिक चारा पुरवतात.
उन्हाळ्यातील व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान
आजकाल पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
आधुनिक उपाय - फॉगर्स (Foggers), स्प्रिंकलर सिस्टीम, कूलिंग पॅड, स्वयंचलित पाणी व्यवस्था.
यामुळे गोठ्यातील तापमान कमी राहते आणि जनावरांना आराम मिळतो.
पशुपालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
• जनावरांना उन्हात जास्त वेळ बांधू नये.• दुपारच्या वेळेत चरायला सोडू नये.• जनावरांना सावलीत विश्रांती द्यावी.• पुरेसा चारा व पाणी उपलब्ध ठेवावे.• नियमित पशुवैद्यकीय तपासणी करावी.
उन्हाळा हा पशुपालकांसाठी आव्हानात्मक काळ असतो. या काळात योग्य व्यवस्थापन न केल्यास दूध उत्पादनात घट, प्रजनन समस्या आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे गोठा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जनावरांना उष्णतेपासून संरक्षण मिळते आणि उत्पादनक्षमता टिकून राहते. त्यामुळे प्रत्येक पशुपालकाने उन्हाळ्यातील व्यवस्थापनाच्या सर्व उपाययोजना अंगिकारणे अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. एस. एम. खुपसेविषय विशेषज्ञ (पशुधन उत्पादन)एमजीएम, कृषि विज्ञान केंद्र, गांधेली ,छ.संभाजीनगर.
Web Summary : Protect livestock from summer heat by managing sheds, water, and feed. Provide shade, ample water, and balanced diets. Implement cooling methods and ensure regular veterinary check-ups to maintain productivity and prevent heatstroke.
Web Summary : शेड, पानी और चारे का प्रबंधन करके पशुधन को गर्मी से बचाएं। छाया, पर्याप्त पानी और संतुलित आहार प्रदान करें। उत्पादकता बनाए रखने और हीटस्ट्रोक को रोकने के लिए शीतलन विधियों को लागू करें और नियमित पशु चिकित्सा जांच सुनिश्चित करें।