पुणे: राज्यात गाय, म्हैस, शेळी व मेंढ्यांमधील लाळ खुरकत या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची आठवी फेरी राबविण्यात येणार आहे.
त्यानंतर सलग तीन वर्षे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून न आल्यास राज्य लाळ खुरकतमुक्त म्हणून घोषित करण्यात येणार आहे. परिणामी राज्यातून मांस निर्यात करण्याची संधी मिळणार आहे.
या आठव्या फेरीत १ कोटी ५३ लाख जनावरांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ६० लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहे.
लाळ खुरकत रोग हा गाय, म्हैस, शेळी व मेंढ्यांमधील अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून, त्याचा पशुधन उत्पादन व निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो.
या रोगाच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०३० पर्यंत लसीकरणाद्वारे लाळ खुरकत व सांसर्गिक गर्भपात हे दोन रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
राज्यात १४ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लाळ खुरकत लसीकरणाची सातवी फेरी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे.
राज्यातील १५९ लाख गाय व म्हैसवर्गीय पशुधनापैकी १५३ लाख जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. लाळ खुरकत रोगाचे संपूर्ण निर्मूलन होण्यासाठी दर सहा महिन्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.
त्यानुसार १३ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत लाळ खुरकत लसीकरणाची आठवी फेरी राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक १ कोटी ६० लाख लस व साधनसामग्रीचा पुरवठा केंद्र सरकारमार्फत करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या मानक कार्यप्रणालीनुसार पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक संस्था, सहकारी दुग्ध संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी पशुवैद्यक व पशुपालकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
याबाबत पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे म्हणाले, हे लसीकरण पुढील ४५ दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. लसीकरणाचा फोटो केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करून केंद्र सरकारकडून त्याची पडताळणी केली जाईल.
त्यानंतर सबंध राज्याचे लसीकरण पूर्ण झाल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येईल. यानंतर रोगाच्या प्रतिबंधाबाबत जनावरांमध्ये निर्माण झालेली त्याची प्रतिकारक्षमता तपासणी करण्यासाठी ३० दिवसांनी व ४५ दिवसांनी रक्तचाचणी केली जाईल.
त्यात सर्व जनावरांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिपिंडांची निर्मिती झाली असल्यास रोगीची लागण होत नाही. त्यानंतर सलग तीन वर्षे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून न आल्यास राज्य लाळ खुरकतमुक्त झाल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये जनावरांमध्ये अनेक आजार समोर येत आहेत. कारण ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात येते. त्यातून अनेकदा पाण्यातून, खाद्यामधून औषधे जनावरांच्या खाण्यात येतात. त्यामुळेही त्यांचे आजार वाढू लागले आहेत.
पशुंचे आरोग्य जपण्यासाठी, रोगप्रसार रोखण्यासाठी व पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आपल्या गाय व म्हैसवर्गीय पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे. - डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त, पशुसंवर्धन
अधिक वाचा: खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीनला चांगले दिवस येणार; अजून दरवाढ होण्याची शक्यता
Web Summary : Maharashtra launches its eighth vaccination drive against Foot and Mouth Disease (FMD) in livestock. Aiming for FMD-free status after three years, the initiative targets 15.3 million animals with 16 million vaccine doses, boosting meat export prospects and animal health.
Web Summary : महाराष्ट्र में पशुओं में खुरपका-मुंहपका रोग (एफएमडी) के खिलाफ आठवां टीकाकरण अभियान शुरू। तीन साल बाद एफएमडी मुक्त दर्जा पाने के लक्ष्य के साथ, इस पहल में 1.53 करोड़ जानवरों को 1.6 करोड़ वैक्सीन खुराक दी जाएगी, जिससे मांस निर्यात की संभावनाएं बढ़ेंगी।