अकलूज : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिवाळी पाडवा घोडेबाजारात उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, दिल्ली, बरेली, महाराष्ट्रातून मारवाड व पंजाबी नुक्रा जातीचे घोडे दाखल होऊ लागले आहेत.
३०० जातिवंत घोड्यांची आवक होऊन १२५ घोड्यांच्या विक्रीतून १ कोटी ३० लाखांची उलाढाल झाली आहे. अकलूजच्या घोडेबाजाराविषयी माहिती देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले, प्रत्यक्ष दीपावली पाडव्याला अकलूज घोडेबाजाराचा शुभारंभ होतो.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्यासाठी सुमारे १५ एकर जागा राखून ठेवली आहे. तेथे गर्द सावली देणाऱ्या चिंचेच्या झाडांची लागवड केली असून, झाडेही चांगलीच बहरली आहेत.
त्यात घोडे बांधण्यासाठी दावण आखली आहे. घोडेबाजारात येण्या-जाण्यासाठी प्रशस्त रस्ते, घोडे नाचविण्यासाठी व पळवण्यासाठी पटांगण केले आहे. पाण्याची, विजेची २४ तास सोय आहे.
बाजाराच्या आवारात मच्छर निर्मूलनासाठी फवारणी केली जाते. तसेच, जनावरांच्या डॉक्टरांची सुविधा दिली जाते. घोड्यांच्या श्रृंगार साधनांच्या दुकानासाठी व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
घोड्यांना लागणारा सुका चारा, खुराकाची व्यापाऱ्यांनी सोय केली आहे. शेतमजुरांनी सोय केलेल्या गवतामुळे घोड्यांच्या हिरव्या ओल्या चाऱ्याची सोय होते आहे.
खरेदी-विक्रीचा व्यवहार संगणकीकृत पारदर्शी
बाजारात घोड्याची विक्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदणीची अधिकृत संगणकीकृत पावती दिली जाते. त्यावर घोड्यासह खरेदीदार व विक्रीदाराचे फोटो, वायद्याच्या तारखा नमूद असतात. अशा रीतीने पारदर्शी व्यवहारासह बाजार आवारात सुरक्षेची सोय केली जाते.
१६ वर्षांपासून भरतो बाजार..
◼️ २००९ पूर्वी घोडेबाजार पंढरपूर येथे कार्तिकी वारीला भरत होता. तेथे प्राथमिक सोयीसुविधा मिळत नसल्या तरी व्यापारी परंपरेने जात होते.
◼️ परप्रांतीय व्यापाऱ्यांना आधार नसल्यामुळे व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा व सुविधा केली. तेव्हापासून व्यापाऱ्यांनी दरवर्षी अकलूज घोडेबाजारात येणे सुरू केले.
◼️ त्यामुळे अकलूजचा बाजार व्यापाऱ्यांना देशभरात सुरक्षित वाटतो. हा बाजार प्रत्यक्ष दिवाळी पाडव्याला सुरू होत असला तरी त्या अगोदरच व्यापारी घोडे बाजारात घेऊन येत आहेत, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले.
अधिक वाचा: आता खरेदीखतापूर्वीच जमिनीची हद्द कायम होणार; काय आहे निर्णय? जाणून घ्या सविस्तर