सोलापूर : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ संचालक मंडळ बरखास्तीचा विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांचा आदेश राज्याचे सहनिबंधक शहाजी पाटील यांनी रद्द ठरविला आहे.
संपूर्ण दूध संकलन बंद असलेल्या व कर्जाच्या खाईत सापडलेल्या दूध संघाचा कारभार पुन्हा संचालक मंडळाकडे आला आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघाची दयनीय अवस्था झाली आहे. आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी संचालक मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने दूध उत्पादकांचे पैसे मिळत नाहीत.
दूध संघाच्या कार्यालयाकडे पदाधिकारी फिरकत नसल्याने प्रशासनातील जबाबदार कोणीही दूध उत्पादकांची गाऱ्हाणी ऐकत नाहीत व आर्थिक सुधारणाही होत नाहीत. यामुळे दूध संघ बचाव समितीने संचालक मंडळ बरखास्तीची मागणी केली होती.
सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनंतर ७८ अन्वये संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी केली होती.
संचालक मंडळाने त्या विरोधात राज्याचे सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. पाटील यांनी अगोदर स्थगिती दिली होती. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले.
मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत सहनिबंधकांनीच निर्णय घ्यावा असे आदेश दिले. त्या आदेशानुसार सहनिबंधक शहाजी पाटील यांनी उपनिबंधक राजकुमार पाटील यांचा संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश रद्द केला आहे.
संपूर्ण दूध संकलन बंद असलेल्या दूध संघाचा कारभार पुन्हा संचालकाकडे आला आहे. दूध उत्पादकांचे पैसे देण्याची हमी कोणीच घेत नसलेले संचालक मंडळ पुन्हा अस्तित्वात आले आहे.
दररोज तोट्यात वाढ होत असताना मागील तीन वर्षांत हेच संचालक मंडळ काही उपाययोजना करीत नाही. लेखा परीक्षण व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास नसल्याचे या आदेशानुसार दिसत आहे. दूध संघ वाचविण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. - अनिल आवताडे, चंद्रभागा दूध संस्था, विरवडे
अधिक वाचा: उन्हाळ्यात टंचाईच्या काळात कमी जागेत, कमी वेळेत कसा तयार कराल पोषक चारा? वाचा सविस्तर