Take Care of Livestock : वाढत्या उन्हाचा त्रास माणसाप्रमाणेच जनावरांनाही होतो. त्यामुळे पशुपालकांना (Livestock) नुकसानीलादेखील सामोरे जावे लागू शकते.
दुभत्या जनावरांना उन्हाचा त्रास झाल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांनी (Livestock) जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
जनावरांच्या चारा, पाण्याचे नियोजन तसेच गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागातही पाळीव प्राण्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. वाढत्या उन्हापासून जनावरांचे संरक्षण करणे आवश्यक असते. (Livestock)
उन्हाळ्यात जनावरांच्या (Livestock) गोठ्याचे व आहाराचे व्यवस्थापन न केल्यास जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तीव्र उष्णतेच्या लाटेचा दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.
दुभती जनावरे जास्त दूधनिर्मिती करीत असल्यामुळे दूध निर्माण करताना शरीरात जास्तीची उष्णता निर्माण होते. परिणामी, दुभती जनावरे उन्हामुळे आजारी पडतात. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दूध उत्पादनात १० ते २० टक्के घट येण्याची शक्यता असते. (Livestock)
जनावरांची काय काळजी घ्याल?
* उन्हाळ्यात जनावरांना भूक कमी आणि तहान जास्त लागते. त्यामुळे गुरांना मुबलक स्वच्छ पाणी द्यावे, साधारण तीन वेळा पाणी पिण्यास द्यावे, त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
* उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा खाण्यास द्यावा. तसेच चारा देताना तो कुट्टी करून दिल्यास जनावरांना खाण्यास मदत होते. याचबरोबर सुका चारा खाल्ल्याने जनावरांना पाण्याची गरज जास्त भासत असते. यासह आपण जर गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते फायदेशीर असते.
तापमानात दिवसेंदिवस वाढ
मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सहाः स्थितीत तापमान हे ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, पुढील काळात वाढ होण्याची शक्यता आहे. जनावरांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
श्वानांचीही काळजी घ्या
शहरात श्वान पाळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्यात श्वानांनाही त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळी पशुपालकांनी योग्य खबरदारी घेऊन लसीकरणासह जनावरांचे तापमान नियंत्रित राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पशुपालकांनी गोठ्यात हवा खेळती ठेवावी, पाण्याच्या व चाऱ्याच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. तसेच झाडाखाली जनावरांची व्यवस्था करावी. लसीकरण करणेही आवश्यक आहे. उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. - के. डी. सांगळे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग