सोलापूर : अखेर सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ एनडीडीबीकडे वर्ग करण्याचे ठरले असून येत्या ७ जानेवारी रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान दूध संघाचा कारभार सक्षमपणे चालविणे अशक्य असल्याने प्रभारी व्यवस्थापकीय संचालक सुजीत पाटील यांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा आर्थिक डोलारा कोसळल्याने शिवाय दररोज तोट्यात वाढच होत असल्याने दूध संघ आता कसाबसा सुरू आहे. जिल्हा संघ असे म्हटले जात असले तरी गाव पातळीवरील एखाद्या दूध संस्थेइतकेही संकलन सध्या होत नाही.
माजी आमदार बबनदादा शिंदे चेअरमन असताना वैभवाच्या शिखरावर पोहोचलेला जिल्हा दूध संघ आता कधी बंद पडतो?, अशी अवस्था झाली आहे. जानेवारी महिन्यात प्रतिदिन ५० हजार लिटर दूध संकलन होत होते ते आज ५ हजार लिटरवर आले आहे.
असे असले तरी सुधारणा होण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले जात नसल्याने दररोज तोट्यात भर पडत आहे. जिल्हाच्या वाड्या वस्त्यांवर दूध संकलन तत्कालीन चेअरमन बबनदादा शिंदे यांच्यामुळे सुरू झाले होते.
ते आजही सुरू असले तरी जिल्हा संघाचे संकलन बंद असल्याने शेतकरी खासगी संघाला दूध घालत आहेत. खरं तर ही परिस्थिती काय एक-दोन वर्षांत निर्माण झाली नाही. मागील आठ-दहा वर्षांपासून संघाच्या आर्थिक गाडीची घसरण सुरू असताना संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केले.
त्याचे परिणाम आज जिल्हा दूध संघ अखेरच्या घटका मोजत आहे. दूध संघ बचाव समितीने पत्राद्वारे तसेच जिल्हाधिकारी यांच्या सोबतच्या बैठकीत संचालक मंडळ बरखास्त करा, एनडीडीबीकडे वर्ग करा, अकार्यक्षम अधिकारी हटवा व इतर मागण्या केल्या आहेतच.
संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष
याबाबत माहिती घेण्यासाठी चेअरमन व प्रभारी व्यवस्थापकीय संचालकांना संपर्क केला, मात्र त्यांनी फोन घेतला नाही. मात्र संचालक औदुंबर वाडदेकर यांनी ७ जानेवारी रोजी संचालक मंडळाची बोर्ड बैठक घेण्याबाबत सांगितले असून त्यामध्ये सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ एनडीडीबीकडे वर्ग करण्याचा ठराव घेण्याचेही ठरले आहे. व्यवस्थापकीय संचालकांना कार्यमुक्त करण्याबाबतही बोर्डात निर्णय घेण्यात येणार असल्याचे वाडदेकर यांनी सांगितले.
अधिक वाचा: Gochid Niyantran : जनावरांतील गोचीडांच्या नियंत्रणासाठी टॉप टेन उपाय; वाचा सविस्तर