आटपाडी: आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शनिवारी भरलेल्या आठवडा शेळ्या मेंढ्या व बकरी बाजारात विक्रमी उलाढाल झाली.
या बाजारात नवी लोटेवाडी (ता. सांगोला) येथील शेतकरी सुखदेव निवृत्ती मोरे व भागवत सुखदेव मोरे यांच्या ७ महिन्यांच्या एका बकऱ्याला तब्बल ३२,५०० असा उच्चांकी दर मिळाला.
शनिवारी भरलेल्या या आठवडा बाजारात एकूण ४.५० कोटी ते ५ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, बोकड, बकरी आणि शेळ्यांच्या विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समितीने जाहीर केले आहे.
या आठवडा बाजारात एकूण नऊ बकऱ्यांची विक्रमी किमतीत विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी डॉल्बी लावत जल्लोष केला. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या आनंद सोहळ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी सहभाग घेतला.
तसेच सभापती संतोष पुजारी, सुबराव पाटील, सुनील तळे, धुळा खरात, हणमंत लवटे, व्यापारी, शेतकरी आदींची सहभाग घेतला. या बकऱ्याची खरेदी सुरेश महादेव पुजारी (रा. पुजारवाडी) यांनी केली असून, या व्यवहारामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते.
दरम्यान, या बाजारात आपल्या शेळ्या, मेंढ्या, बकरी, बोकडे, देशी कोंबड्या विक्री व खरेदीसाठी कोकण, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी आले होते.
उत्तम जातीच्या बकऱ्यांना उच्चांकी दर अनेक वेळा मिळाला आहे. मोर यांच्या कुटुंबातील या नऊ बकऱ्या विक्रमी दराने विकल्या गेल्याने त्यांनी डॉल्बी लावत नाचत आनंद साजरा केला.
बाजार समितीकडून अत्यावश्यक सुविधा
या बाजारात शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरविण्यात आल्या असून, त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, लाइट्स, सीसीटीव्ही, स्वच्छतागृहे, अशा अत्यावश्यक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे बाजार परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यास मदत झाली. या सुविधा शेतकऱ्यांच्या समाधानाचा विषय ठरल्या आहेत.
शेतकऱ्यांनी शेळ्या, बोकड आणि बकरी खरेदी-विक्रीसाठी आटपाडी बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या शनिवारच्या आठवडा बाजाराचा अधिकाधिक लाभ घ्यावा. - संतोष पुजारी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी
अधिक वाचा: राज्यातील या दूध संघाने तयार केले मस्टायटीस प्रतिबंधक पशुखाद्य; देशातील हा पहिलाच प्रयोग