Join us

Pashu Ganana 2024 : येत्या महिनाभरात राज्यातील सर्व जनावरांची अचूक संख्या कळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:17 IST

pashu ganana maharashtra राज्यात सुरू केलेली २१वी पशुगणना पूर्ण झाली आहे. पुढील १५ दिवसांत गोळा केलेल्या पशुधनाच्या आकड्यांवर अंतिम हात फिरविण्यात येणार आहे.

पुणे: राज्यात सुरू केलेली २१वी पशुगणना पूर्ण झाली आहे. पुढील १५ दिवसांत गोळा केलेल्या पशुधनाच्या आकड्यांवर अंतिम हात फिरविण्यात येणार आहे.

महिनाभरात राज्यातील सर्व पशुंची माहिती मिळू शकेल, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली. राज्यातील ५१ हजार ७५८ गावे, वॉर्डामध्ये ही गणना २५ नोव्हेंबर ते ३१ मार्च अशी करण्यात आली.

या पशुगणनेसाठी राज्यभरात सुमारे नऊ हजार प्रगणक व पर्यवेक्षकांची नेमणूक केली होती. ही पशुगणना पहिल्यांदाच ऑनलाइन अर्थात अॅपद्वारे करण्यात आली.

यामुळे राज्यातील पशुधनाची संख्या निर्धारित होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येणार आहे. योजनांची सुसूत्रता करता येणार आहे.

यात राज्यातील नागरी व ग्रामीण भागात आढळणाऱ्या एकूण १६ पशुधन जाती व कुक्कुटादी पक्षी यांची प्रजातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा करण्यात आली आहे.

देशात १९१९-२० पासून पशुगणनेस सुरुवात झाली, तेव्हापासून दर ५ वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे. त्यानुसार २०१९ मध्ये २०वी पशुगणना झाली होती.

या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण, नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. २०व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकूण तीन कोटी ३० लाख ८० हजार इतके पशुधन होते.

त्यापूर्वीच्या पशुगणनेच्या तुलनेत त्यात १.८३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती. पशुधनात देशामध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. तसेच कुक्कुट व कुक्कुटादी पक्षी यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. 

या पशुंची केली गणनापशुधनामध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, गाढवे, घोडे, शिंगरे, खेचरे व उंट, कुक्कुट व कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये कोंबड्या, बदके, टर्की, क्वेल, शहामृग, गिनी, इमू, हंस, पाळीव कुत्रे, हत्ती व ससे आणि भटक्या गायी व कुत्रे इ.

प्रत्येक विस्तार अधिकाऱ्याला किमान तीन हजार घरांना भेट देऊन श्वान, दुभत्या जनावरांची माहिती घ्यायला सांगितले होते. ही माहिती अॅपद्वारे गोळा केली आहे. १५ दिवसांत माहितीचे संकलन केले जाईल. महिनाभरात प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर केली जाईल. - डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे

अधिक वाचा: जनावरांना किरळ लागले हे कसे ओळखावे? व त्यावर तात्काळ काय उपाय करावेत? वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायराज्य सरकारसरकारमहाराष्ट्रशेतकरीआयुक्त