Join us

लम्पीच्या अटकावासाठी 'माझा गोठा स्वच्छ गोठा' अभियानास सुरुवात; मोफत औषधोपचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:27 IST

Lumpy Skin Disease : दिवसेंदिवस लम्पीचा कहर वाढत असून पशुधनाच्या मृत्यूमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे याला अटकाव करण्यासाठी 'माझा गोठा स्वच्छ गोठा' ही मोहीम राबविण्यात येत आहे.

दिवसेंदिवस लम्पीचा कहर वाढत असून पशुधनाच्या मृत्यूमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे याला अटकाव करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात 'माझा गोठा स्वच्छ गोठा' ही मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरण मोहीम राबविल्यानंतर सध्या बाधित जनावरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या संसर्गाला नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत.

जिल्ह्यात एकूण ९१ टक्के पशुधनाचे लसीकरण करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बाधित पशुधनास शासनामार्फत मोफत औषधोपचार करण्यात येत आहे. 'माझा गोठा स्वच्छा गोठा' ही मोहीम लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणासाठी तसेच रोगमुक्तीसाठी महत्त्वाची आहे.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मोहिमेची अंमलबजावणी होण्यासाठी तसेच संशयित सर्व लम्पी चर्म रोगग्रस्त पशुंची तपासणी, चाचणी, उपचार व लसीकरण तसेच गोठ्यांचे व परिसराचे निर्जंतुकीकरण इत्यादींसाठी समिती तयार करण्यात येत आहे.

ग्राम पातळीवरील समितीत सरपंच /प्रशासक, दुग्ध उत्पादक संघ, पोलिस पाटील, प्रगतिशील शेतकरी / पशुपालक, संबंधीत गावाचे पशुधन विकास अधिकारी किंवा पशु, पर्यवेक्षक, ग्रामसेवक यांचा सहभाग असणार आहे.

ट्रेस, ट्रॅक व ट्रिट त्रिसूत्रीचा वापर

लम्पी चर्मरोग बाधित पशुधनाच्या निकट संपर्कातील पशुधनाचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रॅक व ट्रिट या त्रिसूत्रीचा वापर करण्यात येत आहे. संशयित सर्व लम्पी चर्मरोगग्रस्त पशुंची तपासणी, चाचणी, उपचार व लसीकरण तसेच गोठ्यांचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी

टॅग्स :लम्पी त्वचारोगदुग्धव्यवसायगायशेतकरीशेतीदूधशेती क्षेत्रमहाराष्ट्र