राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील पाळीव गुरांना मोठ्या प्रमाणावर लम्पी आजाराने ग्रासले असून इतर जनावरांना प्रतिबंधित उपाय म्हणून जवळपास दोन लाख पाळीव गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुपालकांनी निरोगी गुरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार गिते यांनी सांगितले, जिल्ह्यातील काही ठिकाणच्या जनावरांमध्ये लम्पी स्कीन या साथरोगासारखी लक्षणे आढळून येत आहे.
रोगसदृश परिस्थिती निर्माण होऊन या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी जिल्ह्यातील पशुंचे लसीकरण करण्यात येत आहे. रोगसदृश लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदू पासून पाच किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात रिंग स्वरूपात लसीकरणास सुरुवात करण्यात येत आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थांना धोका नाही...
• लम्पी स्किन डिसीज हा गो व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे होऊ शकतो त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
• या रोगाची लागण पशूपासून मानवांना होत नसल्याने पशुपालकांनी घाबरू नये. रोगग्रस्त पशुपासून उत्पादित होणारे दूध व त्यापासून बनणारे पदार्थ मानवी आहारास हानिकारक नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
• प्रतिबंधीत क्षेत्रात आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर राहणार असून त्यानुसार नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
दोन लाख आठ हजार लस झाल्या उपलब्ध...
जिल्ह्यातील पशुंना रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी दोन लाख ८ हजार ७०० लसमात्रा प्राप्त झाल्या असून या लसींचे क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गाय वर्गातील पशुधनाच्या संख्येनुसार वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९२ हजार ९८० गोवर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी