महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे.
या धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना नव्या सवलतींचा लाभ होणार आहे.
पशुपालकाच्या उत्पादनात होणार वाढ
- कृषीप्रमाणे पशुपालन व्यवसायास कर्जावरील व्याज दरात सवलत, पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलार संच उभारण्यास सवलत देण्यात येणार आहे.
- याशिवाय ग्रामपंचायत कर दरात एकसमानता आणण्याकरिता कृषी व्यवसाय दराने कर आकारणी होणार.
- या निर्णयांमुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल.
पशुपालनात कोणत्या व्यवसायांचा समावेश?
दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा समावेश.
शेतकऱ्यांप्रमाणेच कर्ज व विमाही मिळणार!
शेतीसाठी ज्याप्रमाणे शासनाच्या कर्ज व विमा योजना आहेत. त्याप्रमाणे या व्यवसायासाठी या योजना राबविण्यात येणार आहेत.
थेट लाभ कुणाला?
२५,००० मांसल कुक्कुट पक्षी, ५०,००० अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच ४५,००० क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायास, १०० दुधाळ जनावरांचे संगोपन, ५०० मेंढी, शेळीपालन व २०० वराह या दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसायिकांना लाभ होणार आहे.
पशुपालकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर होणार असल्याने पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढून पशूजन्य उत्पादनात वाढ होईल. आर्थिक स्तर उंचावल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण निश्चित कमी होईल. शेतीप्रमाणे अनुदान, नुकसानभरपाई आता पशुपालकांना मिळणार आहे. त्यामुळे आता हा शाश्वत व्यवसायपणे सुरू होईल. - जयसिंगराव शिंदे, कृषी सल्लागार
नीती आयोगाचे निरीक्षण अहवालानुसार कृषी क्षेत्रातील पिकांचा जीडीपीमधील वाटा १२.१ टक्क्यांपासून ८.७टक्क्यांपर्यंत कमी होत गेला आहे. याउलट पशुसंवर्धनाचा वाटा वाढत जाऊन तो ४ टक्क्यांवर स्थिरावला आहे. २०३० पर्यंत दूध, अंडी, मांस यांची एकूण मागणी सुमारे १७ कोटी इतकी राहणार असून, ती तृणधान्यांपेक्षा अधिक असेल. पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामुळे हा व्यवसाय वाढणार आहे. - डॉ. कृष्णा माळी, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, सांगली
अधिक वाचा: महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य; पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय