Kasdah Aajar : कासदाह (Kasdah Ajar) हा दुधाळ जनावरांना होणारा एक आजार आहे. विशेष करून दुधाळ जनावरांमध्ये कासदाह हा आजार दिसून येतो. कासदाह हा आजार गोठ्यातील अस्वच्छतेमुळे होत असल्याचे चित्र आहे. या आजारात जनावरांच्या कासेला (Livestock Kasdah Disease) संसर्ग होतो आणि त्यांचे दूध देणे बंद होते किंवा कमी होते. या आजाराची लक्षणे आणि उपाययोजना याबाबत जाणून घेऊयात....
कासदाह आजाराची लक्षणे :
कासेला सूज येणे, कासेची कास दगडासारखी टणक होणे, जनावरांचे दूध देणे बंद होणे किंवा कमी होणे.
कासदाह होण्याची कारणे आणि उपाययोजना :
- रोग प्रतिकारक्षमता कमी असेल तर गाई, म्हशी लवकर आजारी पडतात.
- व्यवस्थापन आणि आहार या दोन्हीतून कासदाह आजाराला दूर ठेवता येते.
- सडावाटे हे जीवाणू कासेत प्रवेश करीत असल्यामुळे गोठ्यातील व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.
- गोठ्याची रचना, स्वच्छता, गाई, म्हशींच्या सडांना जंतुनाशक द्रावणात बुडविणे, बसण्याच्या जागी वाळू, राख, लाकडाचा भुसा, चुना वापरावा.
- दूध काढणीयंत्राची स्वच्छता राखावी, प्रत्येक गायीचे दूध काढण्याअगोदर हात धुवून घ्यावेत.
- जंतुनाशक द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे.
- आहार व्यवस्थापनात प्रथिने आणि ऊर्जा यांचे संतुलन, शरीराची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सेलेनियम, जीवनसत्त्व ई तसेच झिंक आणि बायोटीनचा वापर करावा.
- कासदाह झाल्यानंतर किंवा लक्षणे दिसून आल्यानंतर पशुवैद्यकीय मदत, खराब दुधाची योग्य विल्हेवाट लावावी.
- गोठ्यात नवीन येणाऱ्या गाई, म्हशी जीवाणूंच्या सुप्त वाहक असू शकतात.
- म्हणून नवीन जनावरे पशुवैद्यकाकडून तपासून कुठलाही आजार नसल्याची खात्री करून घ्यावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी