Jowar Fodder : ज्वारीच्या कडब्याच्या दरात यंदा मोठी वाढ झाली असून बाजारात तेजीचे वातावरण आहे. सध्या कडबा प्रतिशेकडा २,४०० ते २,८०० रुपयांपर्यंत विकला जात आहे.(Jowar Fodder)
उत्पादन कमी आणि मागणी वाढल्यामुळे ही दरवाढ झाली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होत असला तरी पशुपालकांसाठी हा खर्चाचा मोठा बोजा ठरत आहे.(Jowar Fodder)
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी परिसरात रब्बी हंगामातील शाळू ज्वारीच्या कडबा चाऱ्याला यंदा अभूतपूर्व मागणी निर्माण झाली आहे.(Jowar Fodder)
लागवड क्षेत्र घटल्यामुळे उत्पादन कमी झाले असून, वाढत्या मागणीमुळे कडब्याचे दर चांगलेच वधारले आहेत. सध्या कडबा २,४०० ते २,८०० रुपये प्रतिशेकड्याप्रमाणे विकला जात असून, 'कडब्यास सोन्याचा भाव' मिळत असल्याचे चित्र आहे.
कमी उत्पादन, वाढती मागणी
यंदा ज्वारीचे क्षेत्र घटल्याने कडब्याचे उत्पादन कमी झाले आहे. दुसरीकडे उन्हाळा व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची गरज वाढली आहे. त्यामुळे बाजारसावंगी परिसरातील कडब्याला स्थानिक तसेच बाहेरील जिल्ह्यांतून मोठी मागणी येत आहे.
विशेषतः अहिल्यानगर, गंगापूर, वैजापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पशुपालक मोठ्या प्रमाणात कडबा खरेदीसाठी येथे दाखल होत आहेत.
जनावरांसाठी पौष्टिक चारा
शाळू ज्वारीचा कडबा हा दुधाळ गायी-म्हशींसाठी अत्यंत पौष्टिक व पचायला हलका मानला जातो.
या कडब्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते, अशी पशुपालकांची धारणा आहे. त्यामुळेच बाजारसावंगी परिसरातील कडब्याला विशेष मागणी असते.
दरात ६०० रुपयांची वाढ
मागील वर्षी १,८०० ते २,२०० रुपये प्रतिशेकड्याने विक्री होणारा कडबा यंदा २,४०० ते २,८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
म्हणजेच दरात सरासरी ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः मोठ्या, जाड व लांब पेंढी असलेल्या कडब्याला अधिक दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजारात चांगली उलाढाल
झरी, वडगाव, लोणी, बोडखा, धामणगाव, रेल, इंदापूर, पाडळी, टाकळी, राजेराय या भागांत मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक घेतले जाते. येथील कडबा ट्रॅक्टरद्वारे इतर जिल्ह्यांत पाठवला जात असून बाजारात चांगली उलाढाल सुरू आहे.
यंदा कडब्याला अक्षरशः सोन्याचा भाव मिळतोय. उत्पादन कमी असल्याने मागणी वाढली आहे.-जाहीर पटेल, शेतकरी
शेतकऱ्यांना फायदा, पशुपालकांना फटका
दरवाढीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. मात्र, पशुपालकांना वाढलेल्या दरामुळे अधिक खर्च करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सध्या चाऱ्याची टंचाई कायम राहिल्यास कडब्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पशुपालकांनी पर्यायी चाऱ्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे बाजारसावंगी परिसरातील ज्वारी कडबा बाजारात तेजीचे वातावरण असून, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर : Fodder Shortage : '३७७ दिवस चारा पुरेल' दावा फोल? पशुपालक मात्र चिंतेत!
