Hirava Cara : पावसाने पाठ फिरवताच हिरव्या चाऱ्याला सोन्याचा भाव आला आहे. पावसाळ्यात जनावरांना पोषण देणारा हिरवा चारा शेतकऱ्यांना आता त्रासदायक ठरतोय. (Green Fodder)
५ रुपयांत मिळणारी पेंढी आता १५ ते २० रुपयांवर पोहोचली असून, अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पशुधन सांभाळणे मोठं आव्हान बनलं आहे. पावसाच्या उशिरामुळे बाजारपेठेत चाऱ्याची टंचाई जाणवत असून, त्याचा फटका थेट जनावरांच्या पोषणावर बसतोय. (Green Fodder)
राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होत असतानाच आता हिरव्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. (Green Fodder)
सध्या पशुधनाला पोषण देण्यासाठी शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी दररोज धावपळ करत आहेत. जुन महिन्याच्या सुरुवातीस ५ ते १० रुपये पेंढी मिळणारा चारा आता १५ ते २० रुपये पेंढी दराने विकला जातोय. चाऱ्याचे दर वाढल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे.(Green Fodder)
चाऱ्याचा दर तीनपट वाढला!
जून २०२४ मध्ये दर : ५ – १० रु./पेंढी
जून २०२५ मध्ये दर : १५ – २० रु./पेंढी
पावसाळ्यात पशुधन वाळलेल्या चाऱ्यापेक्षा हिरव्या चाऱ्याला अधिक पसंती देतो. त्यामुळे कितीही दर वाढले तरी चारा घ्यावाच लागतो. सध्या काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर अर्धा एकरात चारा घेतला आहे, तोही शहरात विक्रीसाठी पाठवत आहेत.
कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली
ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशा कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण बनली आहे. हे शेतकरी चारा विकत घेण्यासाठी बाजारात येतात, पण वाढलेल्या दरांमुळे पशुधनाला पोटभर खायला देणं मोठं आव्हान ठरतंय.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने मार्ग काय?
* पशुधनासाठी चारा साठवणीचा पर्याय विचारात घ्या
* समूह शेती अंतर्गत हिरव्या चाऱ्याची सामायिक लागवड
* सरकारी गवत बियाणे/चारा योजना, बियाणे कीट यांचा लाभ घ्या
* ग्रामपातळीवर 'चारा बँक' स्थापनेसाठी पंचायतसोबत संपर्क साधा
पावसाचा लपंडाव शेतकऱ्यांच्या पाठीशी लागत नाही. सध्या हिरवा चारा 'सोनेरी' झाला असला तरी यामागचे संकट तेवढंच गंभीर आहे. शेतकऱ्यांनी नियोजन, सहयोग आणि शासकीय योजनांचा लाभ घेतलाच पाहिजे. अन्यथा पशुधनाचे पोषण एक मोठं आव्हान ठरू शकतं.
चाऱ्याची मागणी वाढली
ज्यांच्याकडे विहीर आहे, असे शेतकरी हिरवा चारा विक्री करू लागले आहेत. कमी-जास्त भाव करून त्यांच्याकडून चारा शहरात आणला जात आहे. वाहन खर्च व मजूर खर्च वगळून दोन पैसे पदरात पडत आहेत. आठ दिवसांपासून १० ते २० रुपयांना हिरवा चारा पेंढी विक्री होत आहे. - नरशिंग सैदाने, विक्रेता