गोंदिया : दूध उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावणे, आधुनिक दुग्धव्यवसाय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण रोजगाराच्या भागात संधी निर्माण करणे या उद्देशाने विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ सुरू करण्यात आला आहे.
दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-१ मधून मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर टप्पा-२ राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यातील सर्व १२ जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून, या योजनेंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती आहे.
योजना आणि अनुदान पाहा
उच्च दूध उत्पादनक्षम दुधाळ 3 जनावरे ५० टक्के अनुदानावर, तर भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या उच्च उत्पादनक्षम कालवडी ७५ टक्के अनुदानावर देण्यात येणार आहेत.
पशू प्रजनन पूरक खाद्य आणि 3 दुधातील फॅट व एसएनएफ वाढविणारे खाद्य २५ टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बहुवार्षिक चारा पिकांस १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून मुरघास खरेदीसाठी प्रतिकिलो तीन रुपये अनुदान दिले जाणार आहे.
याशिवाय, विद्युत कडबाकुट्टी यंत्र ५० टक्के अनुदानावर उपलब्ध होणार असून वंध्यत्व निवारण व आधुनिक प्रशिक्षण सुविधा शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना असा घेता येईल योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पशुपालकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधता येणार आहे.
