Dairy Farmers : नांदेड तालुक्यातील राहाटी (बु.) गावात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधला.(Dairy Farmers)
नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील राहाटी (बु.) गावाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच भेट दिली. पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, कृषीपूरक उद्योगांची प्रगती आणि गावातील दुग्धव्यवसायाची यंत्रणा याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.(Dairy Farmers)
कृत्रिम रेतन सेवा, नियंत्रित प्रजनन कार्यक्रम, बायोगॅस प्रकल्प, तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांतर्गत सुरू असलेल्या पनीर निर्मिती उद्योगाची जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी केली. गावातील नवकल्पना, दुग्धउद्योगातील प्रगती आणि शेतकऱ्यांच्या उपक्रमशीलतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.(Dairy Farmers)
कृत्रिम रेतन सुविधांची तपासणी
जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय दुध विकास मंडळ (NDDB), दिल्ली मार्फत पुरविल्या जाणाऱ्या कृत्रिम रेतन सेवांची तपासणी करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जन्मलेल्या कालवडीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी पशुपालकांना आवाहन केले की, उच्च वंशावळीच्या कालवडी तयार करण्यासाठी आधुनिक सेवांचा अधिकाधिक लाभ घ्या आणि घरच्या घरी उत्पादनक्षमता वाढवा.
पनीर निर्मिती उद्योगाची प्रशंसा
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत राहाटी (बु.) येथील शेतकरी दिगंबर केशवराव बोकारे यांनी सुरू केलेल्या पनीर निर्मिती प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पाहणी केली.
बोकारे हे गावातच उत्पादित होणाऱ्या ४०० लिटर दूध वापरून दररोज १८० किलो स्वच्छ, ताजे व भेसळमुक्त पनीर तयार करतात आणि नांदेड शहरात याचा नियमित पुरवठा करतात. या उद्योगाला जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील उत्तम उद्योजकतेचे उदाहरण म्हणत समाधान व्यक्त केले.
दुग्ध विकास प्रकल्प टप्पा–२ बद्दल माहिती
जिल्ह्यात सुरू होणाऱ्या विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २, तसेच NDDB मार्फत राबवल्या जाणाऱ्या बायोगॅस प्रकल्पांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी पशुपालकांना आवाहन केले.
ग्रामीण उद्योजकतेसाठी प्रेरणादायी उपक्रम
या भेटीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, दुग्धव्यवसायातील संधी, बियाणे-प्रजनन क्षमता वाढ, बायोगॅस आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी या प्रकल्पांचा उपयोग होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
नियंत्रित प्रजनन कार्यक्रमाची पाहणी
नांदेड जिल्ह्यात कृत्रिम रेतनाचे प्रमाण दुप्पट करण्यासाठी सुरू असलेल्या Controlled Breeding Programme चीही त्यांनी तपासणी केली. 'एक गाव – एक फार्म' या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पाडिले, पशुधन विकास अधिकारी डॉ. दीप्ती एम. चव्हाण, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ परसराम जमदाडे, मराठवऱ्हाड दूध उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानोबा बोकारे, माधव बोकारे हे उपस्थित होते.
